लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार दिले नाहीत. आपण राजकारणात नाही, लोकसभा निवडणुकीत कोणाला उभे केले आहे, कोणाला पाडा हे देखील मी सांगितले नाही. पण त्याचा गैर अर्थ काढू नये. मी व समाजाने कोणाला पाठिंबा दिलेला नाही, आम्ही एकपण अपक्ष उमेदवार राज्यात उभा केलेला नाही. परंतु विधानसभेसाठी सर्व २८८ जागांवर उमेदवार देणार आहोत, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जारंगे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर दाखल झाले. छत्रपती संभाजीनगर येथून परभणी लोकसभा मतदारसंघातील शहागड येथील गोरी गांधारी मतदार केंद्राकडे जारंगे पाटील आले. आजारी असल्यामुळे ते रुग्णवाहिकेमधून मतदान केंद्रावर आले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, लोकसभेला उमेदवार दिले नाही मात्र आम्ही विधानसभेच्या तयारीला लागलो आहोत. विधानसभेला 288 मतदार संघात आम्ही उमेदवार उभे करणार आहोत.
मतदान हा लोकशाहीचा उत्सव आहे. सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बाजवला पाहिजे. जो उमेदवार सगे-सोयऱ्याच्या बाजूने आहे, त्याला मतदान करा, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. लोकसभेला आम्ही कुणालाही पाठिंबा दिला नाही. मात्र मराठ्यांना बरोबर माहिती आहे, कोणाला मतदान करायचे आहे. आंबेडकर किंवा छत्रपतींच्या गादीचा मान राखला पाहिजे.
मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वीच लोकसभा निवडणूक न लढवण्याची घोषणा केली होती. वंचित आघाडीसोबत लोकसभा लढवण्याबाबत त्यांच्या वाटाघाटी सुरु झाल्या होत्या. डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना युतीचा प्रस्ताव समोर ठेवला होता. परंतु मराठा समाजाने हा प्रस्ताव नाकारला. यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला.