मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सक्रीय आहे. विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात न उतरता राज्यातील परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. मंगळवारी मनोज जरांगे नारायणगडाकडे रवाना झाले. त्यावेळी त्यांनी सांगितले की, मी माझा समाज बंधन मुक्त केले आहे. माझ्या ऐकण्यात समाज आहे. यामुळे मी काही माझा समाज कोणाच्या दावणीला बांधला नाही. समाज विकलाही नाही. मी समाजाचा सन्मान केला आहे. तुम्हाला सांगितले आहे, तुम्हाला ज्याला पाडायचे त्याला पाडा. ज्याला निवडून आणायचे त्याला निवडून आणा. मी आरक्षणाच्या लढाईत लढून लढून मरणार आहे, असे भावनिक वक्तव्य मनोज जरांगे यांनी केले.
आज कार्तिकी एकादशी आहे. यामुळे विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी मी नारायणगडावर जात आहे. यावेळी मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणूक झाल्यानंतर काय करणार ते सांगितले. ते म्हणाले, आता आम्ही सामूहिक आमरण उपोषणची तयारी करत आहोत. सामूहिक आमरण उपोषणाची तारीख आपण सरकार स्थापन झाल्यावर जाहीर करणार आहोत.
बबनराव लोणीकर यांच्यासंदर्भात बोलताना मनोज जरांगे म्हणाले, या लोकांना जातीचा स्वाभिमान नाही. त्यांच्या वागणुकीमुळे मराठा समाज अडचणीत येत आहे. ते आपल्या रक्ताचे असून या पद्धतीची भाषा वापरत असतील तर समाजाने त्यांना दूर ठेवले पाहिजे. या लोकांना 100 % धडा शिकवला पाहिजे. त्याशिवाय हे ठिकाणावर येणार नाही. या लोकांना रस्त्यावर आणण्याची ताकद मराठा समाजामध्ये आहे.
विधानसभा निवडणुकीबाबत समाजाला संकेत दिले आहे. ते त्यांना कळाले आहेत. त्यामुळे संभ्रम ठेऊ नका. लोकसभेला पाडा म्हणलो होतो, आताही पाडा म्हणलो आहे. हे गोरगरिबांना कळले आहे. आता काही संभ्रम नाही. मराठ्यांनी बिनधास्त चालावे. मराठा समाजाने शंभर टक्के मतदान एकजुटीने करावे. आपल्या आरक्षणाला विरोध करणारा गेलाच पाहिजे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले.