संजय सरोदे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, बीड | 11 डिसेंबर 2023 : मराठा आरक्षणासाठी गेल्या तीन महिन्यापासून जीवाचं रान करणारे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना ॲडमिट करून घेण्यात आलं आहे. त्यांच्या तातडीने वैद्यकीय चाचण्याही करण्यात येत आहेत. मात्र, जरांगे पाटील यांची प्रकृती स्थिर असून त्यांची आवश्यक ती तपासणी करण्यात येत असल्याचं त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं.
मनोज जरांगे पाटील यांच्या राज्यभर सभा सुरू आहेत. आज त्यांनी मराठवाड्यात सभांचा धडाका लावला होता. आज त्यांची बीडमध्ये सभा पार पडली. बीड जिल्ह्यातील अंबासाखर कारखाना(वाघाळा) येथे मनोज जरांगे पाटील यांची पहिल्यांदा सभा झाली. या सभेला प्रचंड गर्दी झाली होती. या सभेपूर्वीच्या एका सभेला संबोधित करत असताना मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे ते स्टेजवरतीच बसले होते. त्यांना थकवा वाटत होता. अशक्तपणा जाणवत होता. त्यामुळे त्यांनी अर्ध्यातच भाषण थांबवलं. थोडावेळ जागेवर बसले होते. डॉक्टरांनी येऊन जरांगे पाटील यांची प्रकृती तपासली. त्यांना तीन महिने आराम करण्याचा सल्लाही दिला. पण जरांगे पाटील यांनी हा सल्ला ऐकला नाही.
संध्याकाळी त्यांनी अंबासाखर कारखाना(वाघाळा) येथे सभेला संबोधित केलं. ही सभाही दणक्यात पार पडली. सभेला प्रचंड गर्दी झाली होती. या सभेतून त्यांनी मराठा समाजाला जागरूक राहण्याचं आवाहन केलं. ही सभा आटोपून जात असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे त्यांना तातडीने अंबेजोगाई येथील थोरात रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तात्काळ त्यांचं रक्त घेऊन वैद्यकीय चाचण्या सुरू केल्या आहेत. जरांगे पाटील यांना सलाईन लावण्यात आली आहे.
मनोज जरांगे पाटील यांना अशक्तपणा आला आहे. प्रचंड थकवा आहे. दगदग आणि धावपळ तसेच उन्हात रॅली काढणं यामुळे त्यांची प्रकृती बिघडल्याचं सांगितलं जात आहे. दौऱ्यांमुळे वेळेवर जेवण नसल्यानेही त्यांची प्रकृती बिघडल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं. जरांगे पाटील यांना कमीत कमी तीन महिने आराम करण्याचा सल्ला त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर संदीप थोरात यांनी दिला आहे. मात्र, जरांगे पाटील डॉक्टरांचा सल्ला मानतात की सभा सुरूच ठेवतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.