मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांसमोर संतापले, गुन्हे मागे न घेण्यावरुन बैठकीत वातावरण तापलं

| Updated on: Jan 02, 2024 | 8:00 PM

"तुम्ही आता गुन्हे मागे घ्या किंवा नका घेऊ. आमचं आता ठरलं आहे. तुम्ही आमच्यामध्ये ती खुटी गुंतवून ठेवलेली आहे. आम्ही ते स्वीकारलेलं आहे. आमचा आता नाईलाज आहे. आम्हाला पक्क माहिती आहे. पण आमची चूक काय होती? तुम्ही तो पहिला व्हिडीओ काढा आणि सर्व 400 अधिकाऱ्यांना घरी पाठवा. आम्ही भोगायला तयार आहोत. आमच्यात येऊन मारहाण कशाला केली आणि गोळीबार कशाला केली?", असा सवाल मनोज जरांगे यांनी बैठकीत केला.

मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांसमोर संतापले, गुन्हे मागे न घेण्यावरुन बैठकीत वातावरण तापलं
Follow us on

मुंबई | 2 जानेवारी 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मराठा उपसमितीची बैठक घेतली. या बैठकीत मराठा आरक्षणासाठी करण्यात आलेल्या विविध कामांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या उपसमितीसह मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. यावेळी सरकारकडून मराठा आरक्षणासाठी करण्यात आलेल्या कामांची माहिती देण्यात आली. मनोज जरांगे यांनी सरकारची सर्व भूमिका ऐकून घेतली. त्यानंतर त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. यावेळी मनोज जरांगे यांनी सरकारने दिलेल्या आश्वासनांची आठवण करुन दिली. तसेच आपल्या सगेसोयरे शब्दांचा सरकारने चुकीचा अर्थ काढला, असं मनोज जरांगे यांनी सांगितलं. तसेच कुणबी नोंदी शोधताना काही जातीयवादी अधिकाऱ्यांकडून कामचुकारपणा केला जात असल्याची तक्रार मनोज जरांगे यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या तक्रारीची नोंद घेतली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना कडक आदेश दिले जातील, असं आश्वासन दिलं. त्यानंतर मनोज जरांगे यांनी मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे न घेण्यावरुन आक्रमक भूमिका मांडली.

“निष्पाप लोकांवर विनाकारण गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हे अजून एकही मागे घेण्यात आलेले नाहीत. दोन दिवसाच्या आत गुन्हे मागे घेऊ, असं सांगितलं होतं. पण ते अजून का मागे घेतले नाहीत?”, असं मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बैठकीत विचारलं. त्यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं. “गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. ज्या आंदोलकांनी निष्पापपणे आंदोलन केलं, जे निर्दोष आहेत त्यांच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही. मी पुन्हा संबंधितांना देतो”, असं मुख्यमंत्री म्हणाले. त्यावर मनोज जरांगे यांनी “दोन ते तीन महिने यासाठी थोडी लागतील?”, असा प्रश्न विचारला. “काही जणांचे स्टेटमेंट नोंदवले जात आहेत, प्रक्रिया सुरु आहे”, असं मुख्यमंत्री म्हणाले. त्यावर मनोज जरांगे यांनी “दोन-दोन महिने स्टेटमेंट लिहायला लागतात का?” असा प्रश्न विचारला.

‘आमच्याच लोकांनी मार खाल्ला आणि आमच्याच लोकांना जेलमध्ये का टाकता?’

“आमच्याच लोकांनी मार खाल्ला आणि आमच्याच लोकांना जेलमध्ये का टाकता? आमच्या गावातील गावकऱ्यांना इतकं मारलं की काही गावकऱ्यांना अजूनही शेतात जाता येत नाही. मंत्री गिरीश महाजन यांच्यावर विश्वास ठेवला होता. त्यांनी गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन दिलं होतं. गिरीश महाजन यांना एकाच चव्हाण नावाच्या मुलाचं काम सांगितलं होतं. त्याचं सर्टिफिकेट असूनही रद्द केलं. तरी ते काम झालं नाही, आम्ही अपेक्षा कुणाकडे करायच्या? तुम्ही गुन्हे मुद्दाम ठेवले आहेत. शिंदे साहेब माझा आवाज येतोय का?”, असं मनोज जरांगे म्हणाले.

‘आता गुन्हे मागे घ्या किंवा नका घेऊ, आमचं आता ठरलंय’

यावर मुख्यमंत्र्यांनी एका प्रक्रियेनुसार हे काम करावं लागतं, असं सांगितलं. पण त्या प्रक्रियेला चार महिने लागत नाहीत, असं मनोज जरांगे म्हणाले. “तुम्ही आता गुन्हे मागे घ्या किंवा नका घेऊ. आमचं आता ठरलं आहे. तुम्ही आमच्यामध्ये ती खुटी गुंतवून ठेवलेली आहे. आम्ही ते स्वीकारलेलं आहे. आमचा आता नाईलाज आहे. आम्हाला पक्क माहिती आहे. पण आमची चूक काय होती? तुम्ही तो पहिला व्हिडीओ काढा आणि सर्व 400 अधिकाऱ्यांना घरी पाठवा. आम्ही भोगायला तयार आहोत. आमच्यात येऊन मारहाण कशाला केली आणि गोळीबार कशाला केली? आमच्यात साध्या कपड्यांवर लोकं घातले आणि आमच्यावर हल्ला केला”, असं मनोज जरांगे म्हणाले.

‘शिंदे साहेब तुमच्या चेहऱ्यावरुन मला वाटायला लागलं आहे की…’

“शिंदे साहेब तुमच्या चेहऱ्यावरुन मला वाटायला लागलं आहे की, तुम्हाला बैठक संपवायची आहे. मला ते दिसायला लागलं आहे. पण आमच्या लोकांची डोकं फोडली. तुम्ही ट्रॅक्टरवाल्यांना विनाकारण नोटीस द्यायला लागला आहात. आम्ही मुंबईला अन्नधान्य घेऊन यायचं नाही का?”, असा सवाल मनोज जरांगे यांनी केला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी आपल्याला सकारात्मक भूमिका घ्यायची आहे. इतिहासात जे काही घडून गेलं. पण आपल्याला सकारात्मक राहून निर्णय घ्यायचा आहे. जरांगे आक्रमक झाल्याचं बघितल्यानंतर आमदार बच्चू कडू यांनी मध्यस्थी केली. त्यांनी मनोज जरांगे यांची समजूत काढली.