जालना : मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खूपच खालावली आहे. त्यांना धड उभही राहता येत नाहीय. मनोज जरांगे पाटील स्टेजवरच कोसळले. त्यावेळी त्यांना तिथे असलेल्या दोघांनी सावरलं. आधार दिला. जालन्याच्या अंतरावाली-सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांचा आमरण उपोषण सुरु आहे. त्यांच्या आमरण उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांनी अन्न-पाणी सोडलय. त्याचा गंभीर परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झालाय. ते स्टेजवर उभे राहत असतानाच कोसळले. त्यामुळे आंदोलनस्थळी उपस्थित अससेले गावकरी आक्रमक झाले. तिथे एक मराठा-लाख मराठा अशी घोषणाबाजी सुरु झालीय. ग्रामस्थ मनोज जरांगे पाटील यांना पाणी पिण्याच आवाहन करतायत. आता थोड्याचवेळात ते मीडियाशी बोलणार आहेत असं सांगितल जातय. आज सकाळपासून ते झोपून आहेत. कालही त्यांनी माइक हातात घेतला तेव्हा त्यांचा हात थरथरत होता.
‘पाणी घ्या, पाणी घ्या, जरांगे पाटील पाणी घ्या’ अशी घोषणाबाजी गावकऱ्यांकडून सुरु आहे. एक मुलगी त्यांच्यासाठी पाण्याची बॉटल घेऊन आलीय, पण मनोज जरांगे पाटील यांनी पाणी घेतलेलं नाहीय. वैद्यकीय उपचार न घेण्यावर मनोज जरांगे पाटील कायम आहेत. “समाजाच तुम्हाला ऐकावच लागेल. आज तुम्हाला पाणी प्यावच लागेल असा आवाज समोर असलेल्या गर्दीतून आला. त्यावर ठिकय, मी चार-पाच घोट पाणी पीतो” असं जरांगे पाटील म्हणाले.
‘सरकारला एकाचा बळी घ्यायचा असेल तर घेऊ द्या’ जरांगे पाटील म्हणतात…
“पाणी पिण्याचा हट्ट केला, तर आरक्षण कसं मिळणार? असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. तुमची माया मला कळतेय. मी पाणी प्यायलो तर लेकराला कस न्याय मिळेल. मी या समाजाला माय-बाप मानतो हे खरं आहे. सरकारला एकाचा बळी घ्यायचा असेल तर घेऊ द्या. पण तुम्ही जर असा हट्ट धरला, तर आपल्या लेकराला न्याय मिळणार नाही. जाणुन-बुजून मराठ्याच्या लेकरावर अन्याय केला जातो असं मला वाटतं” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. शरीरात ताकत नसल्याने मनोज जरांगे पाटील आज झोपूनच उपस्थितांशी संवाद साधतायत.