‘त्याच्या बापाच्या डोळ्यात अश्रू नाही, रक्त निघतं’, मनोज जरांगे यांचं शिवसंग्रामच्या मंचावर भावनिक भाषण

| Updated on: Jun 30, 2024 | 4:03 PM

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज शिवसंग्राम संघटनेच्या मंचावरुन भाषण केलं. यावेळी त्यांनी भावनिक भाषण केलं. आरक्षणामुळे एक-एक मार्काने मराठा तरुणांची संधी हुकते. त्यावेळी त्याच्या कुटुंबात काय अवस्था होते, याबाबत मनोज जरांगे म्हणाले.

त्याच्या बापाच्या डोळ्यात अश्रू नाही, रक्त निघतं, मनोज जरांगे यांचं शिवसंग्रामच्या मंचावर भावनिक भाषण
मनोज जरांगे पाटील, मराठा आंदोलक
Follow us on

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज शिवसंग्रामच्या मंचावरुन भाषण केलं. या भाषणात मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भूमिका मांडली. मनोज जरांगे यांनी यावेळी मंत्री छगन भुजबळ यांच्यावरही निशाणा साधला. “गोरगरिबांना आरक्षण मिळालं पाहिजे. आरक्षणासाठी 400 ते 500 जणांचं बलिदान गेलं. एकही बलिदान वाया जाऊ द्यायचं नाही. ही आपली जबाबदारी आहे. आपण आता हटायचं नाही. कधीही वेळ आली आणि संकट आलं तरी मराठ्यांनी मागे हटायचं नाही. शंभर टक्के मराठा मोठा करायचा आहे. मी जातीवाद केलेला नाही. माझ्या समाजाला आरक्षण हवं आहे. ते स्वप्न घेवून मी रस्त्यावर उतरलोय. मराठा जातीवादाला जबाबदार नाही. आपले शिवसंग्रामचे प्रमुख विनायक मेटे यांनी आरक्षणासाठी बलिदान दिलेलं आहे. स्वातंत्र्याच्यानंतर ओबीसींना आरक्षण मिळालं. आम्ही 150 वर्षापासून आरक्षण मागत आहोत. ओबीसी नेत्यांना मात्र हे समजत नाही”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

“आमची जमीन असताना त्या सातबारावरचं नाव खोडा असं तुमचं म्हणणं आहे. 57 लाख नोंदी मिळाल्या. मराठ्यांच्या त्या नोंदी रद्द करायला सांगतात. मग जातीवादी कोण करतंय? आम्ही मराठा ओबीसीतूनचं आरक्षण घेणार. तुम्हाला मिळालं आहे. आम्ही तुमचं घेत नाही. आम्ही दीडशे वर्षांपूर्वीचे आहे ते आम्ही घेतोय. आमचं लेकरू एक मार्काने हुकते. त्याच्या बापाच्या डोळ्यात अश्रू नाही, रक्त निघतं. हे तुम्हाला कळणार नाही”, असं मनोज जरांगे म्हणाले.

“आमचं लेकरं गळ्याला फास लावून घेत आहे. आमच्या भावना तुम्हाला कळणार नाही. तुमच्या लेकरांना आम्ही आपलं मानतो. तुम्ही आमच्या लेकरांना आपलं मानत नाहीत. तुम्हाला तुमचा विचार बदलायचा असेल तर बदला. पण मी माझे मत बदलणार नाही”, असं जरांगे म्हणाले.

जरांगे यांचा भुजबळांवर निशाणा

“येवलावाला अंतरवालीजवळ उपोषण सोडवायला आला. हा जातीवाद नाही का? तुम्ही एकत्र आल्यानंतर आम्ही काय बोललो नाही. तुम्ही लोक आम्हाला अडवायला लागला. मराठ्यांच्या नादी लागू नका. टांगे उलटेपालटे होतील. या मराठ्यांनी मनावर घेतलं तर काहीही होवू शकतं. आम्हीच 50 ते 51 टक्के आहोत. मंत्री छगन भुजबळ यांच्यासारखा भाऊ एक एकरात भावाचं नाव आलं तरी वावर देत नाही. न्यायाधीश आणि मंत्रिमंडळ माझ्याकडे आले. त्यांना कुणालाचं आरक्षण कळत नव्हतं. सगेसोयऱ्यांची व्याख्या आमच्याप्रमाणे असणार आहे. सगासोयरे आम्हाला समजलं नाही का?”, असा सवाल मनोज जरांगे यांनी केला.

“मला राजकरणात यायचं नाही. गोरगरिबांना आरक्षण देवून वर्दी चढलेली पाहायची आहे. आम्हाला राजकारण करायचं नाही. 13 जुलैनंतर आम्ही राजकारणात उतरलोत तर 288 आमदार पाडूनच राहू. पाडायचे की निवडून आणायचे हे 13 जुलैला ठरवणार. लोकसभेत न सांगता पाडले. विधानसभेत नाव घेवून पाडा असं सांगणार आहोत. 11 जुलैला शांतता मराठा जागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. विनायक मेटेंना आम्ही अभिवादन करणार आहोत. मी वेळ आली तर बलिदान द्यायला तयार आहे. पण मराठ्यांना आरक्षण देवूनच राहणार”, असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी केला.