दत्ता कनावटे, मुंबई, 15 डिसेंबर | मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला गंभीर इशारा दिला आहे. आपले जे ठरले होते, त्याप्रमाणे काय झाले? हे 17 तारखेपर्यंत सांगा. सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आतापर्यंत काय झाले, हे स्पष्ट करा. अन्यथा 17 तारखेला ते फोटो आणि व्हिडिओ आम्ही प्रसार माध्यमांना देणार आहे. तसेच 17 तारखेला मराठा समाजाची अंतरवली सराटी येथे बैठक बोलवण्यात आली आहे. सकाळी नऊ वाजता होणाऱ्या या बैठकीत सरकारकडून आरक्षणासंदर्भात काय झाले आणि पुढे आंदोलन कसे करायचे? यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. या बैठकीला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.
आम्हाला आता टिकणारे आरक्षण हवे आहे. तुम्ही वेगळ्या पद्धतीने आरक्षण दिले तर ते पुन्हा कोर्टात टिकणार आहे का? तुम्ही दिलेल्या आरक्षणानंतर आणखी कोणी न्यायालयात गेले तर आम्ही पुन्हा लढतच राहायचं का? यामुळे आम्ही ओबीसीमध्ये आहोत. आम्हाला ओबीसीचे आरक्षण द्या, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. मराठा समाजाच्या आंदोलनामुळे क्यूरेटीव्ही पिटीशन दाखल झाली आहे. परंतु त्याऐवजी आम्हाला आमच्या हक्काचे आरक्षण द्या. ते आम्ही स्वीकारणार आहोत. मराठा समाजाला ओबीसीमध्ये घ्या.
विधानसभेत बोलताना छगन भुजबळ यांनी आपणास गोळी मारली जाईल, असा अहवाल पोलिसांचा असल्याचे म्हटले होते. त्यावर बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, भुजबळ हे खोटे बोलत आहेत. फडणवीस यांनी त्यांचा वापर करून पवारांना संपवले. परंतु भुजबळ यांनी मराठा समाजबद्दल बोलू नये.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना मराठे उघडे पाडणार असल्याचे वक्तव्य मनोज जरांगे यांनी केले होते. त्यानंतर भाजपा आमदार नितेश राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांना गंभीर इशारा दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत वक्तव्य केल्यास गाठ मराठ्यांशी असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा हल्ला चढवला. गाठ कुणाची कुणासोबत आहे, हे आम्हाला माहिती आहे. फडणवीस त्यांना बोलायला लावत आहे. मराठ्यांना कळले की हे वाटोळे करायला निघाले. जातीपेक्षा पक्ष मोठा समजायला लागले आहे.