मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. त्यांच्या प्रकृतीबद्दल महत्त्वाची अपडेट आहे. संगे सोयरे कायद्याची सरकारने अमलबजावणी करावी या मागणीसाठी ते आमरण उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती आज खालावली आहे. आज आरोग्य पथकाने जरांगे पाटील यांची आरोग्य तपासणी केली. या तपासणीत जरांगे पाटील यांचा बीपी कमी झाल्याच समोर आलंय. या सोबतच त्यांची शुगर पण कमी झाली असून त्यांना उपचाराची अत्यंत आवश्यकता असल्याची प्रतिक्रिया जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर जयश्री भुसारे यांनी दिलीय.
आज त्यांनी जरांगे पाटील यांच्या तब्येतीची तपासणी केली त्यानंतर माध्यमांशी बोलतांना त्यांनी ही प्रतिक्रिया दिलीय. दरम्यान जरांगे पाटील यांनी उपचार घ्यावे, अन्यथा त्यांची प्रकृती आणखीन खालावेल असं डॉक्टर जयश्री भुसारी माध्यमांशी बोलताना सांगितलं. दरम्यान आम्ही त्यांना वारंवार उपचार घेण्यास सांगतोय. मात्र जरांगे पाटील यांनी उपचार नाकारल्याची प्रतिक्रिया डॉक्टर जयश्री भुसारे यांनी दिली आहे.
‘मराठा जाती विरोधात बोलू नका’
काल जालन्यातून निवडून आलेले खासदार अमर काळे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. काँग्रेसचे अमर काळे यांनी भाजपाचे दिग्गज उमेदवार रावसाहेब दानवे यांचा पराभव केला आहे. अमर काळे भेटीसाठी आलेले त्यावेळी जरांगे पाटील यांनी काँग्रेसला इशारा दिला. “मराठा आरक्षण आणि मराठा जाती विरोधात बोलू नका, अन्यथा विजय वडेट्टीवारला पाडेन आणि काँग्रेसच्या सर्व सीट पाडेन” असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालात मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा फॅक्टर चालला होता. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला.