संजय सरोदे, जालना, दि.20 जानेवारी 2024 | मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आज अंतरवाली सराटी येथून निघणार आहेत. मुंबईत निघण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. आता २६ जानेवारीपासून नाही तर अंतरवली सराटीपासून म्हणजेच आजपासून आमरण उपोषण करण्याच्या तयारीत आपण आहोत. त्यासंदर्भात समाजाला विचारुन निर्णय घेणार आहे. समाजातील सर्वांना विश्वासात घेऊन मी निर्णय घेणार आहे. समाजाला विचारुन मी आजच हा निर्णय जाहीर करणार आहे. आता समाजासाठी जीव अर्पण करायचे आहे. मराठयांसाठी टोकाचे पाऊल उचलणार आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
मनोज जरांगे पाटील आज सकाळी 10 वाजता मुंबईकडे निघणार आहे. यामुळे अंतरवली सराटीच्या मुख्य रस्त्यावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला. आंदोलक जिथून बाहेर पडणार त्या ठिकाणी लावले बॅरिकेट लावण्यात आले आहे. मुंबईला निघण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते भावूक झाले होते. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. आता छातीवर गोळ्या लागल्या तरी माघार नाही. समाजासाठी मी बलिदान देण्यास तयार आहे. उपोषण २६ जानेवारीपासून करायचे होते. त्यापेक्षा आजच का करु नये? हा विचार मी केला आहे. याबाबत समाजाला विचारुन निर्णय घेणार आहे.
मराठा समाजाने सरकारला आरक्षणासाठी 7 महिने वेळ दिला. परंतु आरक्षण मिळाले नाही. यामुळे आरक्षण घेण्यासाठी मुंबईत येणार आहे. आता आरक्षण घेतल्या शिवाय राहणार नाही. तुमच्या मुलाला न्याय मिळावा म्हणून ही मुले मुंबईला जात आहेत. आता मी असेल नसेल विचार जागे ठेवा, असे सांगताना मनोज जरांगे पाटील भावूक झाले. सरकार आम्हाला रोखण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आम्ही आमचे टप्पे पाडले आहेत. मी येथून एकटा निघालो तरी मुंबईमध्ये करोडो लोक असणार आहेत. आता आम्ही चारी बाजूने लढणार आहोत. ही आरक्षणसाठी शेवटची लढाई आहे.