“सगळ्या महाराष्ट्रातील बांधवांना आवाहन करतो. काही काही म्हणत आहेत मी तुम्हाला तिकीट देतो, पैसे द्या. काय जण सांगतात, मला काही जागा सोडण्याचे अधिकार दिले आहेत. मी म्हटलं राखीव मधल्या असो, साधे कोणी असो, पैसे कोणी देऊ नका. पैसे दिले असतील तर माघारी घ्या, तुझ्या काही हातात नाही. आता गरिबांना खरा न्याय आहे. पाठिंबा फुकट, तिकीटही फुकट मग त्या सत्ताधाऱ्यात आणि विरोधकात आमच्यात काय बदल राहिला? काल एका जणांनी बैठकीत जाहीर सांगितलं म्हणून मला हा विषय घ्यायला लागला”, असं स्पष्टीकरण मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिलं.
“काहीजण म्हणतात जरांगे पाटलांनी मला सांगितले, तुम्ही ती जागा सोडा आणि मला पैसे द्या. ते खरं आहे की खोटं आहे मी ते प्रत्यक्ष बघितलं नाही. तसं असेल तर तुम्ही आपले पैसे मागे घ्या. इथे फुकट पाठिंबा मिळणार आहे. मी दुकानदाऱ्या बंद केल्या आहेत. गरिबाला न्याय द्यायचं काम सुरू केलं आहे. पैसे देऊ नका. तुमचे पैसे वाया जातील. उपयोग होणार नाही. मी कोणाचं ऐकत नाही. कानात बोललेलं ऐकत नाही. कोणाला चिरीमिरी देऊ नका. पैसे मागितले तर कानफाडात द्या”, अशा सूचना मनोज जरांगे यांनी आंदोलकांना दिल्या.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेतेमंडळींकडून मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत. आतापर्यंत अनेक दिग्गज नेत्यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. विशेष म्हणजे आजदेखील अनेक नेत्यांनी जालन्यातील अंतरवली सराटी गावात दाखल होत जरांगेंची भेट घेतली आहे. तुळजापूरचे काँग्रेसचे उमेदवार धीरज पाटील यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची अंतरली सराटी येथे जावून भेट घेतली आहे. भाजपाचे राणा पाटील यांच्या विरोधात धीरज पाटील काँग्रेसचे उमेदवार आहेत. यावेळी मनोज जरांगे पाटील आणि धीरज पाटील यांच्यात चर्चा देखील झाली आहे. यानंतर धीरज पाटील यांनी टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया दिली.
“तुळजापूर तालुक्यातील आणि जिल्ह्यातील सर्व परिस्थिती मनोज जरांगे पाटील यांना सांगितली. ते सगळीकडे उमेदवाराची चाचपणी करणार आहेत. आम्ही सांगितलं की मतांचे विभाजणी न होता आपण सर्वजण मिळून बरोबर राहिलो तर चांगले दिवस येतील”, अशी प्रतिक्रिया धीरज पाटील यांनी दिली.
माजी आमदार संतोष टारफे यांनीदेखील आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. संतोष टारफे हे कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार आहेत. कळमनुरी मतदारसंघात ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेंची शिवसेना अशी लढत होत आहे. या ठिकाणी शिंदे गटाकडून आमदार संतोष बांगर हे उमेदवार आहेत. दरम्यान, संतोष टारफे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात आज चर्चा झाली आहे. माजी आमदार टारफेंना कळमनुरी मतदारसंघासाठी जरांगे पाटलांच्या पाठिंब्याची अपेक्षा आहे.