मराठा नेते मनोज जरांगे यांनी आज पुन्हा राज्य सरकारला इशारा दिला आहे. मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला सगेसोयरेच्या मागणीसाठी 13 जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. मुदत दिलेल्या वेळेत राज्य सरकारने मागणी मान्य केली नाही तर जरांगे यांनी राज्य सरकारला मोठा इशारा दिला आहे. आम्हाला हलक्यात घेतलं तर सरकारलाही कळेल, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. मनोज जरांगे यांनी यावेळी आपण राज्य सरकारच्या शिष्टमंडळावर पूर्णपणे विश्वास ठेवल्याचंदेखील म्हटलं आहे. ते राज्य सरकारच्या भूमिकेकडे सकारात्मकतेने पाहत आहेत. “मंत्री शंभूराजे देसाई आले. त्यांनी शब्द दिला. मी राजकारण नाही तर समाजाचं हित समोर ठेऊन त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मनोज जरांगे यांनी यावेळी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या उपोषणावरही प्रतिक्रिया दिली. “लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. आमचा विरोध नाही. त्यांच्यावर उत्तर द्यायचं? मी एकही ओबीसी नेत्याला बोललो नाही. तायवाडे आणि इतर लोकांना काही बोललो नाही. ते विरोधक नाहीत. ज्यांना मानलं त्यांना मानलं आहे. काय म्हणायचं तो त्यांचा प्रश्न आहे. दुसऱ्यांचे मुल डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. मराठ्यांचे मुल मोठं झालं पाहजे, असा छातीवर हात ठेऊन विचार केला पाहिजे”, असं मनोज जरांगे म्हणाले.
“मुख्यमंत्री एका जातीचे नाहीत. मुख्यमंत्र्याला जातीत तोलयाचं नसतं. मुख्यमंत्र्याला कुणी काय म्हणावं तो त्यांचा प्रश्न आहे. मी त्यांचा प्रवक्ता नाही”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “एक वर्ष झाला. आता काय मिळवलं, काय गमावलं हे सांगेन. 13 जुलै नंतर हे सांगता येईल. नंतर कोण काय गमावेल हे पण समजेल”, असं सूचक वक्तव्य मनोज जरांगे यांनी केलं.
उपोषणाला बसेलेले ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ गेलं. याबाबत मनोज जरांगे यांना प्रश्न विचारला असता, “मला त्यावर बोलायचं नाही. मी असले उत्तर द्यायला बसलो नाही. कायदा घटनेपेक्षा मोठे झाले आहेत का? यांना उत्तर देत नाही. लॉजिक सांगायला घटना चालक आहे का? इथे सरकार न्यायमंदीर आहे. तुम्हाला प्रश्न असेल तर तिकडे जाऊन विचार. ज्याच्वरया अपल्याला रस नाही त्यावर बोलत नाही. माझा ध्येय आरक्षण मिळवणं आहे. माझ्या जातीने थोडा काचका दाखवलं आहे. नंतर बसने फिरणं कठीण होईल. आपल्याला हलक्यात घेतलं तर सरकारलाही कळेल. शिंदे, फडणवीस यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला आहे. फडणवीस बल देत असतील आम्हाला आरक्षण मिळत असेल तर चांगलं आहे. फडणवीस दुश्मन नाहीत. सरकारला वेळ दिला. आता आरक्षण दिलं तर ठीक. नाही दिलं तर समाज लढायला तयार आहे”, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.
यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावरही उत्तर दिलं. “लोकशाहीत कोण कुणाला लढू नका असं म्हणतं? आम्ही एकडून तुम्ही तिकडून. मात्र एवढ्या मोठ्या माणसाने बोलू नये. धनगर समाजाला ST मधून आरक्षण मिळवण्यासाठी एवढे प्रयत्न केले असते तर बरं झालं असतं. आम्हाला विरोध करायचं काम करण्यापेक्षा धनगर समाजासाठी केलं असतं तर त्या समाजाचं कल्याण झालं असतं. आपण आपला राजकीय विचार समोर ठेवण्यापेक्षा धनगर समाजासाठी विचार करा. निवडणुकीतून आम्हाला उभं राहता येणार नाही ही कोणती मागणी आहे? मराठ्याला आरक्षण मिळालं तर आम्हाला राजकीय आरक्षण मिळणार नाही. ७-८ लोकांचं नुकसान होईल. इतर लोकांचं कल्याण होईल”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.