मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी पाडापाडीचा प्लॅन काय? याबाबत माहिती दिली. “पाडापाडीचा निर्णय एक-दोन दिवसात होईल, आणि त्यासाठी एक ते दोन दिवस पुरेसे आहेत. मी सामाजिक कामासाठी बाहेर आहे. हा लढा सुरू ठेवायचा आहे आणि जिंकायचा आहे. मला हे बघायचे होते, उमेदवार दिले होते, आणि याला tv9 साक्षीदार आहे. आजही लोक तितकेच आहेत. लोकांमध्ये काही फरक पडलेला नाही, ते म्हणतात तुम्ही म्हणाल तसं. तुम्ही म्हणाले, पाडा तर पाडा. उमेदवार ज्यांना माघार घ्यायला लावली, त्यांचे पण काही म्हणणे नाही. काहींना समाजाच्या जीवावर काही व्हायचे आहे, समाजाला काही द्यायचे काम नाही, आणि ते समाजासाठी आमच्यासोबत नव्हते. पण मला आणि माझ्या समाजाला एकीचा फायदा समाजासाठी करायचा आहे”, असं मनोज जरांगे म्हणाले.
“लोकसभा निवडणुकीत मी उमेदवार कशाला पाडले, मराठ्यांनी पाडले, मी गरीब माणूस आहे. मी कोणाचे नाव घेतले नाही. गोरगरिबांनी मोठमोठे घरी झोपवले. हे मात्र खरे आहे. गरीबात किती ताकत आहे हे देशाने आणि महाराष्ट्राने बघितले. ते बघणेही गरजेचे होते. कारण आम्हाला किंमत नव्हती. अगोदर मतदान करण्यासाठी बाहेर काढायचे. आता म्हणतात मुलगा उभा आहे, आणि आता डायरेक्ट मराठ्यांच्या चपलासकट पाय पडतात. मराठ्यांच्या आंदोलनामुळे मराठा समाज सोडून ज्या छोटया छोटया जाती आहेत, आता नेते त्यांच्या दारात जात आहेत”, असं मनोज जरांगे म्हणाले.
मनोज जरांगे यांना यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. “आता नसतील न बोलले, त्यांना कालच सांगितले, आमच्या नादी लागू नाका म्हणून, आम्ही तुमचे काही विरोधक नाहीत. त्या देवेंद्र तात्यांचे ऐकून काही करायचे नाही. तात्याला काही कळत नाही, दुपारी त्यांना उमचलळ्यावाणी होते. आमच्या समाजाचे पोरं तुम्हाला मानणारे आहेत. पुन्हा जर फड फड केली तर आपला पट्टा सुरू होत असतो”, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.
मनोज जरांगे यांना त्यांच्या दौऱ्याबाबत विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. “मला माझ्या समाजाला भेटायला जायचे आहे, आमचा लढा आम्हाला जिवंत ठेवायचा आहे. समाजासाठी मी पुढे गेलो तरी मागे का सरकू नये? माझ्या समाजासाठी मी मागे सरकलो. एका जातीवर निवडणूक जिंकता येत नाही. पण त्यामध्ये एक-दोन विषय किचकट होते. पण तो विषय मी आता सोडून दिला आहे. आता ज्यांनी त्यांनी आपल्या पद्धतीने चालत राहावे”, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांन दिली.
यावेळी मनोज जरांगे यांना त्यांच्या भूमिकेचा फायदा महाविकास आघाडीला होईल का? असा प्रश्न विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी “आता आम्हाला काय माहित कुणाचा फायदा कुणाला होईल. त्यांना मराठ्यांनी सांगितले होते आरक्षण द्या, मी उपोषण केले होते. देवेंद्र फडणवीस साहेब आमचे वाटोळे करू नका. तुम्हाला संधी आहे आरक्षण द्या, त्यांनी दिले. पण दुसऱ्या जातीला, मराठ्यांना दिले नाही. मराठ्यांना हीन वागणूक दिली”, अशी प्रतिक्रिया दिली.
“आम्ही त्यांचे विरोधक नव्हतो. पण तुम्ही मराठ्यांच्या छाताडावर बसून खुन्नस दिली. नाही गिणत आम्ही मराठ्याला. त्यांच्या पक्षात काही चांगले आहेत. पण हा चालक चांगला नाही. हा भाजप आणि आरएसएस संपवायला लागला”, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली.