बीड सरपंच हत्या प्रकरणी आरोपी वाल्मिक कराड याच्यावर अखेर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसआयटीच्या या कारवाईवर मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मला ही माहिती तुमच्याकडूनच कळत आहे. अजून माझ्याकडे अधिकृत माहिती आलेली नाही. पण एक चांगली गोष्ट आहे की, त्याला मोक्यामध्ये घेतलंय. त्याला कलम 302 मध्ये घेणं खूप गरजेचं आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं, एकालाही सोडलं जाणार नाही. ही इतकी भयंकर टोळी आहे की, एका जणाने खंडणी मागायची, बाकीच्यांना खून करायला पाठवायचं, काही जणांना गाडीत टाकायला पाठवायचं. ही सगळी लाभार्थी टोळी आहे, खुनातले आणि खंडणीतले एकच आरोपी आहेत”, असं मनोज जरांगे म्हणाले.
“या खंडणीखोरांना दहशत माजवायची आणि जातीय तेढ निर्माण करायची आहे. जातीय तेढ निर्माण करणारे जातीवादी धनंजय मुंडे यांची टोळी आहे, या टोळीचा समूळ नायनाट झाला पाहिजे. आम्ही त्यांच्या समाजाला कधीही बोललो नाही. कारण त्यांच्या समाजामध्ये चांगले लोक आहेत. खंडणीवाल्याला मकेका लावला असेल तर मुख्यमंत्र्यांचे कौतुकच आहे”, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली.
“कायद्याचं काम कायदा करणार आहे. एसआयटी निष्पक्षपणे काम करत आहे, असं वाटतं. सीआयडी पण तसं काम करत आहे. पोलीस प्रशासन देखील तसंच करत आहे. मुख्यमंत्री साहेबांकडे एकच म्हणणं आहे की, यातून कोणीही सुटता कामा नये. मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की, खंडणीतले आणि खुनातले आरोपी एकच आहेत. त्यांना कलम 302 मध्ये घेऊन मोक्का लावा आणि ही अंडर ट्रायल केस चालवा”, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली.
“आरोपींना साथ देणारे जे आहेत ही लाभार्थी टोळी राज्यभर पसरली आहे. त्यांना सगळ्यांना सहआरोपी करणं गरजेचं आहे. त्यांना सगळ्यांना पुन्हा मकोकाखाली घेऊन त्यांचा नायनाट होईल, तेव्हा आम्ही मुख्यमंत्री साहेबांची पाठ थोपटणार आहोत. सर्व आरोपींची एकदा नार्को टेस्ट होऊ द्या”, अशी देखील मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली.