महेंद्रकुमार मुधोळकर, सागर सुरवसे, बीड, दि.23 डिसेंबर | मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची शनिवारी बीडमध्ये सभा होत आहे. त्यांनी राज्य सरकारला दिलेला अल्टीमेटम रविवारी संपणार आहे. त्यापूर्वीच म्हणजे २३ डिसेंबर रोजी जरांगे पाटील यांची ईशारा सभा आयोजित करण्यात आली आहे. सोलापूर रोडवरील पाटील मैदानावर 100 एकर परिसरात ही सभा होणार आहे. या सभेतून जरांगे पाटील सरकारला नेमका काय इशारा देणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दुपारी दोन वाजता सभेला सुरुवात होणार आहे. दरम्यान या सभेमुळे शाळा बंद करण्याचा निर्णयावर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांची इशारा सभा दुपारी होत आहे. त्या निमित्ताने पाटील मैदान सज्ज झाले आहे. सभेमुळे बीड शहर भगव्या पताक्याने सजवले आहे. शहरातील सर्वच महापुरुषांच्या पुतळ्यांची सजावट करण्यात आले आहे. सभेच्या ठिकाणी किल्ल्याची प्रतिकृती असलेले भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. या सभेला येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी 3 टन खिचडी, 4 लाख पाणी बॉटल आणण्यात आल्या आहेत.
बीडमध्ये कुठलाही तणाव नाही. मनोज जरांगे पाटील यांची सभा शांततेत होईल. त्यासाठी आम्ही पोलीसांचा रूट मार्च घेतला आहे. बऱ्याच ठिकाणी आम्ही सीसीटीव्ही लावले आहेत. त्यावरून आमचे लक्ष राहणार आहे. दोन अपर पोलीस अधीक्षक आणि 55 अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. साधारणतः पोलीस आणि होमगार्ड असे 1800 कर्मचारी तैनात आहेत. सकाळी आठ वाजल्यापासून प्रमुख रस्ते बंद होतील. अत्यावश्यक सेवा वाहतूक सुरू राहील.
जाळपोळ प्रकरण झाल्याने काही लोकांना आम्ही नोटीस दिल्या आहेत. हे पोलिसांचे नियमित कार्य आहे. बीडममधील शाळा बंदचे आदेश कोणी दिले माहीत नाहीत. तसे आदेश आम्ही काढले नाहीत. शाळा जरी सुरू असल्या तरी काहीही अडचण नाही. पोलीस यंत्रणा सतर्क आहे, असे पोलीस अधीक्षक ठाकूर यांनी म्हटले.