जालना जिल्ह्यातील भोकरदनमधील कैलास बोराडे यांना झालेल्या मारहाणास वेगळेच वळण मिळाले आहे. कैलास बोरडे हे अनवा गावातील एका मंदिरात घुसले. त्यानंतर मंदिरात शिरला म्हणून कैलास बोराडे यांना तप्त लोखंडी सळईने चटके देऊन अमानुष मारहाण केल्याची माहिती समोर आली होती. त्यासंदर्भातील व्हिडिओ समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाले. या प्रकरणास आता वेगळेच वळण मिळाले आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी कैलास बोरडे यांचा व्हिडिओ समोर आणला आहे. त्यात अर्धनग्न आणि मद्यधुंद अवस्थेत कैलास बोरडे मंदिरात शिरल्याचा दावा करण्यात आला आहे. मंदिरात विटंबना करणाऱ्यांसाठी मकोकासारखा कायदा आणण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली.
मनोज जरांगे यांनी कैलास बोरडे प्रकरणाचा उल्लेख करत सांगितले की, महापुरुषांची विटंबान करणाऱ्यांना आणि देव देवांची विटंबना करणाऱ्यांना मकोका लाववा पाहिजे. विधिमंडळाच्या या अधिवेशनात मकोकासारखा नवीन कायदा आणला गेला पाहिजे. तुम्ही हिंदुत्ववादी असाल तर हा कायदा करा. यावेळी मनोज जरांगे यांनी कैलास बोराडे याचा मद्यधुंद अवस्थेतील व्हिडिओ मनोज जरांगे यांनी दाखवला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावर टीका करताना मनोज जरांगे म्हणाले, कैलास बोरडे प्रकरणात जातीवाद आणला जात आहे. परळीत आमच्या एका व्यक्तीला दुसऱ्या जातीच्या व्यक्तीने खूप मारले. परंतु त्या प्रकरणाकडे आम्ही पाहिले नाही. कारण आम्हाला जातीवाद आणयचा नाही. कैलास बोराडे यांना झालेल्या मारहाण प्रकरण विधानसभेत सदस्य छगन भुजबळ यांनी उपस्थित केले होते.
मनोज जरांगे यांनी सरकारला पुन्हा आपल्या मागण्यांची आठवण करुन दिली. ते म्हणाले, या अधिवेशनात तत्काळ कुणबी प्रमाणपत्र द्यावेत. आरक्षणाची अंमलबजावणी करावी. सगे सोयरे अंमलबजावणी करण्यात यावी. मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेऊ म्हणणारे पावणे दोन वर्षे झाले तरी गुन्हे मागे घेण्याचा शब्द पाळत नाही. शिंदे समिती काम करत नाही. शिंदे समितीला २४ तास कामाला लावावे. ८ मागण्यांपैकी चार मागण्या तत्काळ मान्य करु, असे फडणवीस म्हणाले होते. मात्र त्या मागण्याही मान्य झाल्या नाही.