महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे मतदान २० नोव्हेंबर रोजी होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या मैदानातून मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी माघार घेतली आहे. त्यानंतरही ते मराठा समाजाने कोणाला मतदान करावे? त्यासंदर्भात वक्तव्य करत आहे. मनोज जरांगे यांनी म्हटले की, मी जे लोकसभेला सांगितले तेच विधानसभेला सांगत आहे. माझा मराठा समाज बुद्धिजीवी आहे. तो थोडाही संभ्रमात राहत नाही. मराठा समाज बरोबर पाडणार आहे. आता तुम्ही कोणत्याही पक्षात फिरा. परंतु मतदान करताना लेकरांच्या आणि जातीच्या बाजूने पडले पाहिजे, हे लक्षात ठेवा, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे म्हणाले, मराठा समाजामध्ये प्रचंड आक्रोश आहे. मराठा समाज दारिद्र्यात लोटला गेला आहे. त्यामुळे आता तो रस्त्यावर उतरला आहे. महाराष्ट्रातील मराठा समाजाला माझी विनंती आहे. आता तुम्ही संभ्रमात राहू नका. मतदान केंद्रावर जाताना फक्त जात मुलगा आणि मुलगी हे डोळ्यासमोर ठेवा. त्यानंतरच मतदान करा. आपल्याला जात मोठी केल्याशिवाय आणि आपली लेकरे मोठी होणार नाही. त्याशिवाय समाज घडवणार नाही.
मी मराठा समाजाला बंधन मुक्त केले आहे. ज्याला पाडायचे त्याला पाडा. ज्याला निवडून आणायचे त्याला निवडून आणा. मी माझा मराठा समाज कोणाच्याही दावणीला बांधलेला नाही. मी माझ्या समाजालाच मालक ठेवला आहे. समाजाला आरक्षण देण्यासाठी मी खंबीर आहे. फक्त राजकारण डोक्यातून काढून टाका. या राज्यात माझे मराठे शंभर टक्के मतदान करणार आहेत. मराठ्यांनी मतदान करताना विचारपूर्वक मतदान केले पाहिजे, असेच मी आवाहन करत असल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
सर्व जातीवर अन्याय झाल्यानंतर लोक बदलाच्या शोधात असतात. आता राज्यात शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहे. गरीब मुस्लिम आणि धनगरांचे मराठ्यांचे प्रश्न आहेत. त्यामुळे फक्त एकट्यानेच खाऊन चालत नसते, असा टोला मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणास विरोध करणाऱ्यांना लगावला.