राज्याचा अर्थसंकल्प काल सादर करण्यात आला. सरकार बजेटमध्ये लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची घोषणा करेल असं सांगितलं जात होतं. पण सरकारने कोणतीही तरतूद केली नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींचा हिरमोड झाला आहे. या मुद्द्यावरून आता मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. सरकारचं आता भागलं आहे. त्यामुळेच लाडक्या बहिणींसाठी बजेटमध्ये काहीच दिलं नाही. उलट लाडक्या बहिणींना अपात्रतेच्या नावाखाली योजनेतून काढलं जात आहे, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली. ते मीडियाशी बोलत होते.
सरकारने शेतकऱ्यांना काहीच दिलं नाही. कर्जमाफी नाही आणि कर्जमुक्तीही नाही. गोरगरिबाच्या आरक्षणाचा प्रश्नही मार्गी काढला नाही. म्हणजे किती गोड बोलून मान कापली जाते. त्यामुळे इथून पुढे सांगायचं कमी, बोलायचं कमी आणि अचानक आंदोलन करायचे या भूमिकेशिवाय सरकार आता ठिकाणावर येणार नाही, असा इशारा जरांगे यांनी दिला.
बहीण ही बहीण असते…
सरकार निवडून येईपर्यंत किती पाया पडत होतं. किती लाडक्या बहिणींना पैसे दिले. अगदी तिसऱ्या तळात राहणाऱ्या लाडक्या बहिणीला सुद्धा पैसे दिले. मग आज का या लाडक्या बहिणींना बाहेर काढायला लागले? याचा अर्थ त्यांचा आता भागलंय. त्यामुळे त्यांना आता फक्त गोड बोलायचं. मात्र करायला चुकायचं नाही. त्यांच्याकडे जसा कावा आहे, तसा गोरगरिबांकडे सुद्धा आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. एक मार्ग म्हणजे सरकार गोरगरिबांना कळू देत नाही. शेवटी बहीण ही बहीण असते. त्यामुळे तिला का बाहेर काढलं? असा सवाल त्यांनी केला.
तुम्ही जातीयवादी आहात
मी आरक्षण मागतोय म्हणजे मला विनाकारण जातीवादी ठरवू नका. तुम्ही मागितलं त्यावेळी आम्ही तुम्हाला जातीवादी म्हटलं नाही. फक्त गरिबांच्या लेकरासाठी आरक्षण लागतं म्हणून मागत आहे. तुम्ही आमच्या आरक्षणाला विरोध करताय म्हणजे तुम्ही जातीवादी आहात, असा हल्लाच जरांगे यांनी चढवला.
आमची फसवणूक झालीय
शंभर टक्के सरकारकडून फसवणूक झालेली आहे. योग्य वेळी योग्य होणं गरजेचं होतं. त्यावेळी आम्हाला ओबीसी आरक्षणात जायचं होतं आणि ओबीसींच्या कायद्यात दुरुस्ती करायची असेल तर त्याची अधिसूचना सरकारने काढली पाहिजे. सरकारने अधिसूचना काढायलाच उशिर लावला. त्यामुळे आमची फसवणूक झाली आहे, असा आरोप त्यांनी केला.
डाव कसे टाकायचे आम्हाला माहीत
आता डाव कसे टाकायचे हे आम्हाला चांगलं माहीत आहे. परंतु आरक्षण आम्ही घेणारच आहोत. अजून थोडं थांबू आणि अशी पण तयारी करू की चारही बाजूंनी तुम्हाला जायला रस्ता मिळणार नाही. आता मुख्यमंत्र्यांनी हे सुद्धा लक्षात ठेवावं, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
ऊन खूप आहे, नाही तर…
आता खूप ऊन आहे, नाहीतर त्यांना आताच कचका दाखवला असता. मागच्या वेळी मुंबईला गेलो आणि सुखरूप परत आलो. नाहीतर त्यांना आताच झटका दाखवला असता. परंतु ऊन खूप आहे. जे व्हायचं ते होणार आहे. त्यांना चारही रस्ते बंद होतील, असंही ते म्हणाले.