विधानसभा निवडणुकीत शालेय विद्यार्थ्यांची चंगळ, सलग 4 दिवस मिळणार सुट्ट्या?

| Updated on: Nov 14, 2024 | 7:27 PM

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १८, १९ आणि २० नोव्हेंबरला अनेक शिक्षक निवडणूक कर्तव्यावर असल्याने अनेक शाळांना बंद ठेवावे लागण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने याबाबत शाळांना सूचना पाठवल्या आहेत. शाळा बंद ठेवण्याचा निर्णय संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना घ्यायचा आहे. त्यामुळे या तीन दिवसांच्या सुट्टीचा शालेय विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. रविवारही यात समाविष्ट असल्याने विद्यार्थ्यांना एकूण चार दिवसांची सुट्टी मिळणार आहे.

विधानसभा निवडणुकीत शालेय विद्यार्थ्यांची चंगळ, सलग 4 दिवस मिळणार सुट्ट्या?
school
Follow us on

राज्यभरात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं वातावरण आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. तर दुसरीकडे येत्या 20 नोव्हेंबरला मतदान असल्याने प्रशासन कामाला लागलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या कामात मोठ्या संख्येने शिक्षक निवडणूक ड्युटीवर अहेत. त्यामुळे अनेक शाळांना 18, 19 आणि 20 नोव्हेंबरला शाळा चालविणे अशक्य आहे. त्यामुळे राज्य सरकारने याबाबत शाळांना विनंती पत्र पाठवलं आहे. ज्या शाळांना शाळा भरवणे कठीण आहे त्या शाळांना सुट्टी देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या सचिवांकडून सर्व शाळांना तसं विनंती पत्र पाठवण्यात आलं आहे. पण शाळेला सुट्टी देण्याबाबतचा निर्णय त्या त्या शाळेला घ्यायचा आहे. अर्थात ज्या शाळांकडून सुट्टी जाहीर केली जाणार त्या शाळेच्या विद्यार्थ्यांना 18,19 आणि 20 नोव्हेंबरची सुट्टी तर मिळणारच यासोबत 17 नोव्हेंबरला रविवार असल्याने सलग चार सुट्ट्यांचा आनंद शालेय विद्यार्थ्यांना घेता येणार आहे.

निवडणूक कर्तव्यावर अनेक शिक्षक असल्यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शाळा या तीन दिवस भरवणे कठीण जात आहे. शिवाय मतदान केंद्र सुद्धा अनेक शाळाच आहेत. या सगळ्याचा विचार करून 18, 19 आणि 20 नोव्हेंबर या तीन दिवशी ज्या शाळांना शाळा सुरु ठेवणं शक्य नसेल त्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. “18, 19,20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीत शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यांमुळे ज्या ठिकाणी शाळा भरवणे शक्य नसेल त्या ठिकाणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना शाळा बंद ठेवण्याबाबत निर्णय घेण्याबाबत सूचना द्या”, असं विनंती पत्र राज्य सरकारच्या शिक्षण आयुक्तांनी सर्व शाळांना पाठवलं आहे.

शिक्षण आयुक्तांनी विनंती पत्रात नेमकं काय म्हटलं आहे?

“उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने दिनांक १८,१९ व २० नोव्हेंबर, २०२४ रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबतचा प्रस्ताव आपण शासन मान्यतेसाठी सादर केला आहे. सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ राज्यात सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यामुळे ज्या ठिकाणी शाळा भरवणे शक्य नसेल, त्या ठिकाणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवण्याबाबतचा निर्णय घेणेबाबत आपण आपल्यास्तरावरून आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात, ही विनंती”, असं शिक्षण आयुक्तांनी पत्रात म्हटलं आहे.