“जातीवादचं उत्तम उदाहरण म्हणजे मंत्री छगन भुजबळ. मराठा नोंदी रद्द करण्याची मागणी केली. देशात केवळ मराठ्यांच्या नोंदी सरकारी आहेत. बाकी कोणाच्या नोंदी सरकारी नाहीत. मुख्यमंत्री साहेब, एकही नोंद रद्द केली तर याद राखा. तुमचे 288 आमदार पाडले म्हणून समजा”, असा मोठा इशारा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा शिंदे सरकारला दिला. मनोज जरांगे पाटील यांनी आज धाराशिवच्या सभेत मंत्री छगन भुजबळ आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी आणखी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं. “राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेच्या श्रीमंत मराठ्यांना आरक्षण लागत नाही. त्यांच्या मुलांना आरक्षणाची गरज नाही”, असं मोठं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं. राज्य सरकारने काल मराठा आरक्षणावर मार्ग काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. पण या बैठकीला महाविकास आघाडीने बहिष्कार टाकला होता. यावरुन त्यांनी संबंधित वक्तव्य केलंय का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.
“भुजबळ तू मराठ्यांच्या नादाला लागू नको. गिरीश महाजनच्या मतदारसंघात जायचे आहे. तो पण लय वळवळ करतोय. त्याच्या मतदारसंघात 1 लाख 36 हजार मराठा मतदार आहेत. तिथले दोन नगरसेवक आले होते. ते म्हणाले, याचा कार्यक्रम लावतो. 1994 ला आमचे 16 टक्के आरक्षण आमच्या डोळ्यादेखत घेतले. त्यावेळी आम्ही आनंदाने तुम्हाला स्वीकारले. पण आता आमची वेळ आल्यावर तुम्ही विरोध करता”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“भुजबळच्या नादात तुमच्यावर वाईट वेळ येईल. ओबीसी मतांची गरज आहे म्हणून ओबीसीला जवळ कराल. पण भुजबळचं ऐकून तुम्ही भाजपचं नुकसान करून घेऊ नका. मी लोकसभेला केवळ पाडा म्हणालो. आता नाव घेऊन बोललो तर अवघड होईल. सन्मान घ्यायला दुसऱ्याचा सन्मान करावा लागतो. मराठ्यांची सत्ता येणार आणि त्यावेळी जातीवादी अधिकाऱ्यांचा हिशोब होणार म्हणजे होणार. जातीवाद करणाऱ्या अधिकाऱ्यांना आणून बसवले. ज्यांनी आमच्यावर गोळ्या झाडल्या त्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याऐवजी बढती दिली”, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला.
“सोशल मीडियाच्या पलीकडे माझ्याबद्दल काहीच सापडणार नाही. माझ्याकडे पैसे नाही, काही नाही. माझे खिशे उलटे केले तर आठआणे पण खिशातून पडणार नाहीत. तुम्ही फक्त माझ्याबद्दल सोशल मीडियावर लिहू शकता. सोशल मीडियावर लिहितात, हा रानटी आहे, येडं आहे, असं लिहितात. ठिक आहे मी पागल आहे, तू पीएचडी केलेला आहे”, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली.
“राज्यातील एकही नोंद रद्द होऊ द्यायची नाही. जर एक जरी नोंद रद्द झाली तर रस्ता जाम करा. महाराष्ट्रातील सगळे रस्ते जाम करा. गोरगरीब मराठ्यांना गावखेड्यात अन्याय सुरू झालाय. त्यामुळे त्याच्यावर अन्याय होत असेल तर तो आडवा. काही नाही करता आले तर किमान तिथे जाऊन उभे राहा म्हणजे पुढच्या वेळी होणार नाही”, असं आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या नागरिकांना आवाहन केलं.