महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आज मोठा दिवस आहे. कारण मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज अखेर आपली भूमिका जाहीर केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार देणार असल्याचं जाहीर केलं आहे. पण ज्या ठिकाणी मराठा समाजाची ताकद आहे तिथे उमेदवार देणार, असं त्यांनी जाहीर केलं आहे. मनोज जरांगे यांनी आज आपल्या समाजाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर मनोज जरांगे यांनी भूमिका मांडली. मनोज जरांगे यांनी यावेळी सुरुवातीला आपली स्वत:ची निवडणूक लढवण्याची इच्छा नसल्याचं स्पष्ट केलं. यानंतर त्यांनी तीन महत्त्वाचे मुद्दे मांडले. या मुद्द्यांमध्ये आपण कुठे उमेदवार उभे करणार आणि कोणत्या मतदारसंघात कुणाला पाठिंबा देणार? याबाबत जरांगे यांनी अधिकृतपणे भूमिका मांडली.
“ज्याला आपली मागणी मान्य आहे, जो आपल्या विचाराचा आहे त्याला मतदान द्यायला काय हरकत आहे. मी म्हटलं का तुम्हाला हे निवडून आणा ते निवडून आणू नका, मी आपल्या विचाराचा म्हणालो आहे. आता आपण बघणार आहोत कोणत्या जागेवर उमेदवार उभे करायचे, फॉर्म भरून घ्यायचे, अर्ज मागे घेतले तरी पैसे बुडत नाहीत मी विचारून घेतलं. कुठे मराठ्यांची ताकद आहे, कुठे मुस्लीमाची ताकद आहे हे समीकरण जुळलं तरच त्याच्यात मजा आहे”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“एका जागेवर सीट निवडून येत नाहीत हार होईल, मी समीकरण जुळवतोय, जर नाही जुळलं तर अवघड आहे. त्यामुळे तुम्ही अर्ज भरून ठेवा. फॉर्म भरला की आपण सांगून देऊ, यांना फॉर्म काढून घ्यायचा, यांना ठेवायचा, तरीसुद्धा फॉर्म ठेवला तर आपण समजून घ्यायचं की त्यांनी पैसे घेतले आणि आपल्या विरोधात उभा राहिला. फॉर्म काढ म्हटलं की, काढायचा तोपर्यंत समीकरण जुळतात का ते बघतोय. या चार-पाच दिवसात मी पटापट काम करतो आणि कोणत्या मतदारसंघात सीट निघते ते बघतो आणि कोणत्या मतदारसंघात पाडायचे ते सांगतो”, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील म्हणाले.