‘चिल्लर म्हणा आणि सोडून द्या’, मनोज जरांगे यांनी लावला राज ठाकरे यांचा एका वाक्यात निकाल

| Updated on: Aug 05, 2024 | 9:51 PM

राज ठाकरे यांनी आरक्षणाबाबत मांडलेल्या भूमिकेवर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "त्यांना आरक्षण काय आहे कळते का? हे गोरगरीब लोकांच्या जीवाशी खेळणारे लोक आहेत आणि हे पण सत्तेचाच भाग आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या विरोधात सुरू केलेल्या अभियानाचा हा भाग आहे. श्रीमंत राजकारण्यांना गरीब मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न नाही कळणार", अशी टीका देखील मनोज जरांगे पाटील यांनी केली.

चिल्लर म्हणा आणि सोडून द्या, मनोज जरांगे यांनी लावला राज ठाकरे यांचा एका वाक्यात निकाल
राज ठाकरे आणि मनोज जरांगे पाटील यांचा फोटो
Follow us on

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राला आरक्षणाची आवश्यकता नाही, असं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी सडकून टीका केली आहे. विशेष म्हणजे जरांगे यांनी या मुद्द्यावरुन मराठा आंदोलकांना मोलाचं आवाहन केलं आहे. यावेळी त्यांनी राज ठाकरेंवर टीका केली. “मला त्यातले काही माहीत नाही. बोलणारे बोलत असतात. मराठ्यांनी ध्यान द्यायचे नाही. आपले काम करत राहायचे. डायव्हर्ट करण्यासाठी हे कुटाने सुरू करत आहेत आणि राज ठाकरे पण सत्तेचे एक भाग आहेत, अंग आहेत. चिल्लर म्हणायचे आणि मराठ्यांनी सोडून द्यायचे. पुढच्या 2024 च्या लढाईसाठी मराठ्यांनी संयम बाळगावा”, असा सल्ला मनोज जरांगे यांनी मराठा आंदोलकांनी दिला.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यावर जाब विचारण्यासाठी मराठा आंदोलक आज धाराशिवमध्ये ते थांबलेल्या हॉटेलमध्ये गेले. यावेळी राज ठाकरे यांनी त्यांना भेटण्यास आधी विरोध केला. त्यामुळे मराठा आंदोलकांनी तिथेच ठिय्या मांडला. या घडामोडवर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली. “त्यांना काय जाब विचारायचा? त्यांना आरक्षण काय आहे कळते का? हे गोरगरीब लोकांच्या जीवाशी खेळणारे लोक आहेत आणि हे पण सत्तेचाच भाग आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या विरोधात सुरू केलेल्या अभियानाचा हा भाग आहे. श्रीमंत राजकारण्यांना गरीब मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न नाही कळणार. हे श्रीमंत लोक पैशांच्या गादीवर झोपणारे आहेत. यांना आरक्षण काय कळणार आहे ते आमच्या भावनेशी खेळतात. गोरगरिब मराठ्यांना आरक्षण मिळावं हा आमचा आक्रोश आहे”, असं मनोज जरांगे म्हणाले.

“आमची भगिनी रडत असेल तर, त्याला भंपकपणा वाटतो. यांना वेदना नाहीत. त्यामुळे त्यांच्यापुढे काय आंदोलन करायचं आणि त्यांना काय भेटायचं. आपला मराठा खूप मोठा आहे असे कोणालाही विचारायला जायचे नाही. कोणालाही किंमत द्यायची नाही. त्याच्या काय पाया पडायचे, यांच्या तोंडापुढे उभे राहायचे नाही. सर्वांनी शांत राहून संयम ठेवावा. यांना काही किंमत द्यायची नाही”, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं.

‘प्रकाश आंबेडकर यांचा आम्ही आदर करतो’

यावेळी मनोज जरांगे यांना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी प्रश्न विचारण्यात आला असता, “आम्ही त्यांचा आदर करतो. आम्ही सांगितलेलं त्यांनी ते ऐकावं. मी सामन्यांच्या भावना सांगतो, आणि त्या भावनांकडे त्यांनी लक्ष द्यावे. इकडून तिकडून सांगण्यापेक्षा, मी जी जनतेची भावना त्यांच्याजवळ व्यक्त केली त्याचा विचार करावा. ते महामानवाचे वंशज आहेत. आम्ही गावखेड्यातील आहे आणि मी त्यांच्या भावना त्यांना सांगितल्या आहेत”, असं मनोज जरांगे म्हणाले.

“गरिबांच्या नेत्यांनी एक राहिले पाहिजे, जे वंचितांसाठी बारा बलुतेदारांसाठी, दलितांसाठी, मुस्लिमांसाठी काम करतात त्यांनी एकत्र राहिले पाहिजे असे सामन्यांना वाटते. गरिबांना सत्तेत जाण्याची तेवढीच संधी आहे. ही जण भावना आहे आणि ही भावना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. या भावनेची त्यांनी कदर केली पाहिजे. सर्व राजकारण्यांना पायाखाली तुडवण्याची हीच वेळ आहे. नाहीतर कोणाला काही सांगण्याची वेळ राहणार नाही”, असं मनोज जरांगे प्रकाश आंबेडकर यांना उद्देशून म्हणाले.