मुंबई, दि. 14 फेब्रुवारी 2024 | मराठा समाजाच्या आरक्षणाचा अद्यादेशाचे कायद्यात रूपांतर करावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरु आहे. गेल्या चार दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती ढासळली आहे. दुसरीकडे सगेसोयरे कायदा करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रक्रिया सुरु आहे. यासंदर्भात विशेष अधिवेशन बोलवण्याचा हालचाली सुरु आहेत. या प्रकरणासंदर्भात हरकती मागवण्याची प्रक्रिया सुरु आहे. आतापर्यंत ३० हजारांपेक्षा जास्त हरकती आल्या आहेत. हरकतीसाठी अजून तीन दिवस मुदत आहे. यामुळे ५० हजारांपर्यंत हरकती जाण्याची शक्यता आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी या कायद्याला विरोध केला आहे. दरम्यान आता सगेसोयरे कायदा करण्यासाठी २० फेब्रुवारी रोजी अधिवेशन होणार आहे.
‘सगेसोयरे’बाबत राज्य सरकारने जारी केलेल्या प्रारूप अधिसूचनेवर ३० हजारांपेक्षा जास्त हरकती आल्या आहेत. राज्य सरकारने २६ जानेवारीला नियमावलीत दुरुस्ती सुचविणारी प्रारूप अधिसूचना जारी केली होती. त्यावर १६ फेब्रुवारीपर्यंत हरकती सादर करण्याची मुदत आहे. आणखी तीन दिवसांत या हरकती व सूचनांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यभरातून ४५ ते ५० हजार हरकती येण्याची शक्यता आहे.
सगेसोयरे अधिसुचनेचे कायद्यात रुपांतर करण्याच्या मागणीसाठी जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु आहे. त्यानंतर सरकार गंभीर नसल्याचा आरोप बीडमधील मराठा आंदोलकांनी केला आहे. यामुळे बीड बंदसह महाराष्ट्र बंदची हाक आज देण्यात आली आहे. आरोग्य सेवा वगळता सर्वच बंद राहणार आहे. शाळा महाविद्यालये आणि बससेवा देखील बंद राहणार आहे.
बंदमध्ये हिंसक होण्याची शक्यता आहे. ओबीसी समाजाकडून आमचे आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न होईल. आम्हाला बदनाम करण्याचे षडयंत्र असू शकते. त्यामुळे पोलिसांनी बारकाईने लक्ष ठेवावे, असे मराठा आंदोलकांनी म्हटले आहे. बंद दरम्यान सर्वच शासकीय आस्थापना बंद राहणार आहेत. कोणीही कायदा हातात घेवू नये. बंद शांततेत झाला पाहिजे, असे मराठा आंदोलकांनी म्हटले आहे. हा बंद सोशल मीडियाच्या माध्यमातून पुकारण्यात आला आहे.