मुंबई, दि.26 जानेवारी 2024 | मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. शुक्रवारी सकाळी ते नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झाले. या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे. या सभेनंतर सभेनंतर मनोज जरांगे पाटील मुंबईकडे मार्गस्थ होणार आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी पोलिसांनी नाकारली आहे. तसेच शिवाजी पार्कची परवानगी नाकारली आहे. आझाद मैदानाची क्षमता लक्षात घेऊन त्यांना परवानगी दिली नाही. परंतु मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी ठाम आहे. पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानाऐवजी खालघरच्या सेंट्रल पार्कचा प्रस्ताव दिला आहे.
मुंबईत रोज ६० ते ७० लाख लोक नोकरीनिमित्त किंवा कामांनिमित्त लोकलने ये-जा करतात. यामुळे आंदोलक मोठ्या संख्येने मुंबईत आल्यास वाहतूक व्यवस्था कोलमडणार आहे. आझाद मैदानाची क्षमता पाच ते सहा हजारांची आहे. या ठिकाणी आंदोलकांसाठी सोयी, सुविधा नाहीत. मुंबईतील भौगौलिक परिस्थिती, लोकसंख्या, वाहनांची संख्या यामुळे मुंबईत अधिक भार शक्य होणार नाही. यामुळे मनोज जरांगे पाटील यांना आंदोलनासाठी मुंबईतील खारघर येथील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्कची जागा दिली आहे.
मनोज जरांगे पाटील नवी मुंबईत शुक्रवारी पहाटे चार वाजता दाखल झाले. यावेळी त्यांचा जोरदार सत्कार करण्यात आला. पनवेलमध्ये जरांगे पाटील दाखल होताच क्रेनने हार घालत आणि जेसीबीने फुलांची उधळण करत जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यात आले.
मराठा आंदोलक आझाद मैदानावर आंदोलन करण्यास ठाम आहे. त्याचवेळी ओबीसी मोर्चाही आझाद मैदानावर काढण्यात येणार आहे. पोलिसांकडून ओबीसींच्या मोर्च्याला परवानगी नाकारण्यात आली आहे. परंतु मराठा आंदोलन करत असलेल्या जागेवरच आंदोलन करणार असा पवित्रा ओबासी नेत्यांनी घेतला आहे. यामुळे प्रजासत्ताक दिनी मराठा-ओबीसी वाद पेटण्याची शक्यता आहे.