अभिजित पोते, मुंबई, दि.27 जानेवारी 2024 | मराठा आंदोलनाचा मोठा विजय झाला आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. मनोज जरांगे पाटील यांना मुंबईकडे कूच करताच सरकार कामाला लागले. मुंबईच्या वेशीत दाखल झालेल्या मनोज जरांगे यांच्या मागण्या शनिवारीच मान्य केल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले होते. परंतु मनोज जरांगे पाटील अध्यादेशावर आडून बसले होते. मग मध्यरात्री सरकार कामाला लागले. रात्री 1 वाजून 45 मिनिटांनी दोन मंत्री जरांगे पाटील यांच्या भेटीला आले. मंत्री दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा यांनी त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सर्व मागण्या मान्य झाल्याचे मनोज जरांगे यांना सांगितले. त्यानंतर पहाटे अध्यादेश काढण्यात आला. यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी नवी मुंबईतून परत जाण्याचा निर्णय घेतला. आता नवी मुंबईत त्यांची आता विजयी सभा होणार आहे.
सरकारच्या शिष्टिमंडळांसोबत मनोज जरांगे पाटील यांच्या मध्यरात्री बैठका सुरु होत्या. रात्री 1 वाजून 45 मिनिटांनी सुरु झालेली बैठक तीन तासांपेक्षा अधिक काळ चालली. त्यानंतर मंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकारांना माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सरकारच्या वतीने आम्ही मनोज जरांगे पाटील भेट घेतली आहे. त्यांच्या मागण्यासंदर्भातील सर्व कागदपत्रे त्यांना देण्यात आली आहे. त्यांनी अनेक मुद्दे मांडले होते. त्याबाबत सविस्तर चर्चा मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी झाली. त्यानंतर सरकारने त्यांना उपोषण मागे घ्यावे अशी विनंती केली.
सरकारच्या शिष्टमंडळाने दिलेली सर्व कागदपत्रे मनोज जरांगे पाटील यांनी तपासून पहिली. त्यानंतर उपोषण सोडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावे, ही मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सकाळी 8 वाजता येऊन त्यांचे उपोषण सोडणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतरवली सराटी येथील राजकीय गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहे. त्याचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांना दिले आहेत. अंतरावली सराटीमधील पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचे गुन्हे अद्याप मागे घेण्यात आले नाहीत.
हे ही वाचा…
मराठा समाजासाठी 2011 पासून आंदोलन, अखेर 2024 मध्ये यश, मनोज जरांगे 14 वर्षांचा वनवास संपला