अहमदनगर, कुणाल जयकर, दि.25 जानेवारी 2024 | मराठा आरक्षणासाठी एकाच वेळी वेगवेगळ्या पातळ्यांवर काम सुरु आहे. मराठा समाजाचे मागासलेपणा सिद्ध करण्यासाठी राज्यात सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. या सर्वेक्षणाच्या आधारे सर्वोच्च न्यायालयात मराठा समाज मागास आहे की नाही? हे सिद्ध होणार आहे. परंतु या सर्वेक्षणातील गोंधळ समोर आला आहे. सर्वेक्षणासाठी नेमलेल्या एका कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या कर्मचाऱ्याचे काही शिक्षण नाही, त्यांना मोबाईल हाताळता येत नाही अन् तो सर्वेक्षणाला निघाला आहे. मग मराठा समाजाला आरक्षण कसे मिळणार ? असा प्रश्न व्हिडिओमधून विचारण्यात आला आहे.
मराठा समाजाचे मागासलेपण शोधण्यासाठी सुरू असलेल्या सर्वेक्षणासाठी अहमदनगर महानगरपालिकेने अजब प्रकार केला आहे. मनपाने पहिली पास असलेल्या कर्मचाऱ्याची नियुक्ती केली आहे. तो कर्मचारी स्वत: म्हणतो, मला काहीच येत नाही. माझे शिक्षण पहिली आहे. मला मोबाईल माहित नाही. हे सर्व साहेबांना सांगितले. त्यानंतर त्यांना सहायक नेमून सर्वेक्षण करा, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. मनपा कर्मचारी मनोज काशीनाथ कांबळे असे या सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांनी लोकांसमोर सर्व कबुली दिली आहे.
मनोज कांबळे हे मनपात इलेक्ट्रीक मदतनीस म्हणून कार्यरत आहे. त्यांचे पहिलीपर्यंत शिक्षण झाले आहे. त्यांनी मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणाचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. परंतु त्यांचे शिक्षण नसल्यामुळे त्यांना काहीच माहिती नाही. तसेच मोबाईलची माहीत नाही आणि हे सर्वे सर्वेक्षण मोबाईलवर होत आहे. यासंदर्भात आपण अधिकाऱ्यांना कल्पना दिली. तरी अधिकारी ऐकत नाही. मदतनीस घेऊन काम पूर्ण करण्याचे त्यांनी म्हटले आहे. मग या पद्धतीने जर मराठा आरक्षणाचे सर्वेक्षण होत असेल तर आम्हाला आरक्षण कसे मिळणार ? असे व्हिडिओ करणारा व्यक्ती म्हणत आहे. या व्हायरल व्हिडिओमुळे सर्वेक्षणाची पोलखोल झाली आहे.
हिंगोली जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षण सुरू आहे. या सर्वेक्षणामध्ये प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षक प्रगणक म्हणून काम करत आहेत. शिक्षक गावागावात जाऊन सर्वे करत आहे. यामुळे शाळांमध्ये विद्यार्थी आहेत परंतु शिक्षक नाही, अशी परिस्थिती आहे. शिक्षकांची खुर्ची रिकामी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होत आहे.