दत्ता कानवटे, नवी मुंबई, दि.26 जानेवारी 2024 | मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील नवी मुंबईत दाखल झाले आहे. आता नवी मुंबईत सभा घेतल्यानंतर ते मुंबईत दाखल होणार आहे. त्यापूर्वी राज्यपाल रमेश बैस यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त केलेल्या भाषणात मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट केली. यामुळे मराठा आरक्षणासंदर्भात राज्यातील जनतेला संदेश दिला गेला आहे. त्याचवेळी मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करण्याच्याही हालचाली सुरु आहे. यामुळे मनोज जरांगे यांचे आंदोलन संपण्याची चिन्हा आहेत.
मराठा आरक्षणाबाबत न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. तसेच राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात मे 2023 मध्ये क्यूरेटिव पिटीशन (Curative Petition) दाखल केली. शासनाची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञांचा टास्क फोर्स स्थापन करण्यात आली आहे.
महाराष्ट्राने सर्वच क्षेत्रात विकासाची कास धरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच नवी मुंबई येथे देशातील सर्वात जास्त लांबीचा सागरी पूल असलेल्या ‘अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू’चे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी 35 हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीच्या विकास प्रकल्पांचे देखील उद्घाटन केले. तसेच दावोसमध्ये झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राने ३ लाख ५३ हजार ६७५ लाख कोटींहून अधिक विक्रमी सामंजस्य करार केले आहेत.
सरकारने बळीराजाच्या हिताला नेहमीच प्राधान्य दिले आहे. खरीप हंगाम २०२३ मध्ये प्रतिकूल परिस्थितीमुळे अडचणीत आलेल्या 45.35 लाख शेतकऱ्यांना 2100 कोटी रुपयांहून अधिक भरपाई अदा करण्यात आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनही आपले अनुदान देत असून “नमो शेतकरी महासन्मान निधी” या योजनेत पात्र शेतकरी कुटुंबांना प्रतिवर्षी एकूण 12,000/- रुपये मिळणार आहे. शासनाने दूध उत्पादक शेतक-यांचे आर्थिक हित जपण्यासाठी दूधउत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलीटर 5 रुपये अनुदान जाहीर केले आहे.
सरकारने ग्रामीण गृहनिर्माण योजना गतीमान करण्यासाठी ‘महाआवास आभियान’ सुरू केले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात राज्यात 6.31 लाख स्वयं -सहायता गट निर्माण करण्यात आले आहेत. रोहयो अंतर्गत 32.50 लाख मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. ‘हर घर जल’ अंतर्गत जवळपास 83.03% कुटुंबांना घरगुती नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.
राज्यातील शाळांमध्ये ‘मुख्यमंत्री – माझी शाळा सुंदर शाळा’ हे स्पर्धात्मक अभियान सुरु करण्यात आले आहे. राज्यात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यातील महाविद्यालये व विद्यापीठे नॅक मूल्यांकन व मानांकन प्रक्रियेत अग्रेसर आहेत. अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबईत सीसीटीव्ही बसविण्याची टप्पा २ ची कार्यवाही सुरू आहे. असुरक्षित सागरी तळावर सीसीटीव्ही व नवीन बोटी खरेदी करण्याची कार्यवाही सुरु आहे. महाराष्ट्रात 95 हजार कोटी रुपयांची औद्योगिक गुंतवणूक आकर्षित करण्याचे उद्दिष्ट आहे. त्या माध्यमातून 55 हजार रोजगार निर्माण करण्यात येणार आहेत. मुंबई, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर व दिघी येथे 5 लॉजिस्टिक्स पार्क उभारण्यात येत आहे.