मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी गावामध्ये ड्रोन फिरत आहेत. त्यामुळे अंतरवाली सराटीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचे पडसाद मंगळवारी विधानसभेत उमटले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगे यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी सभागृहात केली होती. दुसरीकडे आता मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. मराठा संघटनांनी मनोज जरांगे यांना झेड प्लस सुरुक्षा देण्याची मागणी केली आहे. त्यासाठी छत्रपती संभाजीनगरात आंदोलन केले.
अंतरवली सराटी या गावावर ड्रोनने टेहळणी होत असल्याचे वृत्त आले आहे. त्यानंतर मराठा समाजात आणि राज्यातील राजकारणातून मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. ड्रोनद्वारे टेहाळणीचे प्रकार कोण करत आहे, कशामुळे ही टेहळणी केली जात आहे? असे प्रश्न निर्माण झाले आहे. परंतु या प्रकारामुळे अंतरवाली सराटीमधील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मनोज जरांगे यांच्या जीवाला धोका असल्यामुळे मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे.
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी अशी मागणी मराठा संघटनेकडून करण्यात आली. त्यासाठी मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या जिजाऊ चौकात मराठा क्रांती मोर्चातर्फे आंदोलन करण्यात आले. त्या आंदोलनात अनेक पदाधिकारी सहभागी झाले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी मनोज जरांगे यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी, अशी मागणी केली.
हिंगोलीत मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये 6 जुलै रोजी जनजागृती शांतता रॅली होणार आहे. या रॅलीची तयारी सुरु झाली आहे. मार्गावर भोंगे लावण्यास सुरुवात झालेली आहे. ठिकठिकाणी पोस्टर लावले आहे. लाखो मराठा बांधव या रॅलीमध्ये सहभागी होणार आहे. त्यासाठी हिंगोली परिसरात प्रचार केला जात आहे.