मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. ज्या ठिकाणी आपले उमेदवार निवडून येतील त्या ठिकाणी उभे करा आणि ज्या ठिकाणी शक्यता कमी आहे त्या ठिकाणी जे उमेदवार मराठा आरक्षणाची बाजू मांडतील त्यांना पाठिंबा द्या असं जरांगे पाटील यांनी रविवारी झालेल्या बैठकीमध्ये म्हटलं आहे. दरम्यान आता त्यांनी मराठा बांधवांना विनंती केली आहे. चार-पाच दिवस अतंरवालीकडे कोणत्याच बांधवांनी येऊ नये, यामुळे मतदारसंघात उमेदवार ठरवता येत नाहीत. माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे, जरा तीस- पस्तीस दिवस मला मोकळा वेळ द्या. गावात राहा, निर्णय काय होतो यावर सावध राहा असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
चार-पाच दिवस अंतरवालीकडे कोणत्याच बांधवांनी येऊ नये, यामुळे मतदारसंघात उमेदवार ठरवता येत नाही. माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे, मला जरा तीस-पस्तीस दिवस मोकळा वेळ द्या, गावात राहा निर्णय काय होतो यावर सावध राहा. खरंच सांगतो मला काम करता येत नाही, आज पूर्ण वेळ दिवस वाया गेला आहे. फक्त फोटो आणि भेटी एवढंच झालं. पुढचं काम झालं नाही तर तुम्ही मला नाव ठेवताल असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आम्ही आजपासून तयारी सुरू केली आहे, कोणत्या मतदारसंघात लढायचं ते. जिथे आम्ही राज्यात लढणार नाहीत, तिथे मिरीटप्रमाणे कोण आहे? अपक्ष ताकदवर कोण आहे हे आम्ही बघणार आहोत. आम्ही वैयक्तिक मतदारसंघात निवडणूक लढवणार आहोत ते फायनल झाल्याशिवाय सांगता येणार नाही. जेव्हा आमचे मतदार संघ आणि उमेदवार फायनल होतील त्या दिवशी ते चित्र स्पष्ट होईल. आम्हाला विचारल्याशिवाय कोणीही लेखी बॉण्ड आणू नका, संयम ठेवा असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.