maratha reservation: मराठा समाजास आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात कोणत्याही युवकाने टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन मनोज जरांगे पाटील वारंवार करत आहे. त्यानंतर आरक्षणाच्या मागणीसाठी टोकाचे पाऊल उचलले जात आहे. आता धाराशिवच्या कळंब तालुक्यातील देवळाली गावात 26 वर्षीय तरुणाने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मराठा सामाजास आरक्षण मिळत नसल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे कुटुंबियांनी सांगितले. योगेश संजय लोमटे असे त्या तरुणाचे नाव आहे.
योगेश संजय लोमटे यांनी गावातील शेतात जावून गळफास घेतला. त्यांच्या खिशात चिठ्ठी सापडली आहे. त्यात चिठ्ठीत मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत असल्याचा मजकुर लिहिला आहे. योगेश लोमटे हे उच्चशिक्षित आहेत. गेल्या काही वर्षांपासून ते नोकरीसाठी प्रयत्न करत होते. परंतु मराठा समाजास आरक्षण नसल्याने नोकरी मिळत नसल्याने ते नैराश्यात आले. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे कुटुंबियांनी सांगितले.
पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांनी पंचनामा सुरु केला आहे. मराठा आरक्षणाचा विषय सुटत नसल्यामुळे तरुण नैराश्यात येत आहे. गेली अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु आहे. यापूर्वी मराठा समाजाला दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. त्यामुळे मराठा समाजास ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे.
मागील आठवड्यात मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करण्याचे संकेत दिले होते. आता यापुढे कमी सांगायचे आणि कमी बोलायचे पण आता करून दाखवायचे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले होते. आपण आपली चाल आता उघड करणार नाही, असे त्यांनी म्हटले होते. आता धारशिव जिल्ह्यातील तरुणाने आरक्षणासाठी जीवन संपवल्यानंतर मनोज जरांगे आणखी आक्रमक होणार आहे.