हा ट्रेलर आहे, यापुढे पिक्चर दाखवू, मराठा समन्वयकाचा हाकेंना इशारा

| Updated on: Oct 01, 2024 | 10:16 PM

पुण्यात हाकेंनी बिअर पिऊन शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा आरोप मराठा कार्यकर्त्यांनी केलाय. मात्र आपल्याला पकडून हल्ला करण्याचा प्रयत्न संभाजीराजेंच्याच सांगण्यावरुन झाला, असा आरोप हाकेंनी केलाय.

हा ट्रेलर आहे, यापुढे पिक्चर दाखवू, मराठा समन्वयकाचा हाकेंना इशारा
Follow us on

पुण्यात बिअर पिवून ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी धमक्या दिल्याचा आरोप मराठा कार्यकर्त्यांनी केला. त्यानंतर हाकेंना पोलिसांच्या ताब्यातही दिलं आणि आता हाकेंनी थेट छत्रपती संभाजीराजेंवरच आरोप केला. संभाजी भोसलेंनी माझ्या अंगावर मारेकरी घातले असं हाकेंचं म्हणणंय. तर हा ट्रेलर आहे, यापुढे पिक्चर दाखवू असा इशारा मराठा समन्वयक गंगाधर पाटलांनी दिला. कोंढव्याच्या टिळेनगर परिसरात हाके सार्वजनिकस्थळी बिअर पित होते असा आरोप मराठा कार्यकर्त्यांनी केला. छत्रपती संभाजीराजेंनाबद्दल अपशब्द का वापरला याचा जाब विचारला असताना शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा आरोप मराठा कार्यकर्त्यांचा आहे.

त्यानंतर मराठा कार्यकर्त्यांनी हाकेंना पकडून कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये आणलं. पोलीस स्टेशनमध्ये चौकशी केल्यानंतर ससून हॉस्पिटलमध्ये हाकेंची अल्कोहोल टेस्ट करण्यात आली. सूत्रांच्या माहितीनुसार हाकेंच्या रक्तात अल्कोहोलची मात्र आढळून आलेली नाही.

एकटं गाठून आपल्याला मारण्याचा प्रयत्न झाला मात्र आपण पळून गेलेलो नाही, असं हाकेंच म्हणणं आहे. पुण्यात रात्री जे काही घडलं, त्यावरुन हाकेंनी संभाजीराजेंवर आरोप तर केलाच. त्याचवेळी मते आणि अमित देशमाने या दोघांची नावं घेतली…या दोघांचा मोबाईल रेकॉर्ड तपासा म्हणजे षडयंत्र कळेल, अशी मागणी हाकेंची आहे.

काही दिवसांआधी जरांगेंच्या उपोषणस्थळाच्या दीड किलोमीटर अंतरावरच हाकेही उपोषणाला बसले होते. आता हाकेंच्या या व्हिडीओनंतर आपण कोणाच्या वैयक्तिक जीवनात पडत नाही, असं म्हणत जरांगेंनी टीका करणं टाळलं.

अद्याप अधिकृत मेडिकल रिपोर्ट आलेला नाही. त्यामुळं हाके खरंच बिअर किंवा दारु प्यायले होते का ? हे अधिकृत रिपोर्ट आल्यावरच स्पष्ट होईल आणि धमकी किंवा शिवीगाळ झाली का ? याचा तपास पोलीस करत आहेत.