महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे यांनी आज आरक्षणाच्या मुद्द्यावर मोठं वक्तव्य केलं. महाराष्ट्राला आक्षणाची गरज नाही, असं मोठं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं. यानंतर राज ठाकरे यांना जाब विचारण्यासाठी मराठा आंदोलकांचं एक शिष्टमंडळ त्यांच्या भेटीसाठी गेलं. राज ठाकरे धाराशिवमध्ये ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत त्या ठिकाणी मराठा आंदोलक गेले. पण राज ठाकरे यांनी भेट देण्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी संबंधित हॉटेलमध्ये ठिय्या मांडला आहे. मराठा आंदोलकांकडून या ठिकाणी आक्रमक भूमिका घेतली जाताना दिसत आहे. ते राज ठाकरे यांच्या भेटीवर ठाम आहेत.
मराठा आंदोलकांचा आक्रमक पवित्रा पाहिल्यानंतर राज ठाकरे यांनी दोन आंदोलकांना भेटण्यासाठी परवानगी दिली. पण कार्यकर्त्यांना ते मान्य नाही. राज ठाकरे यांनी सर्वांना एकत्र भेटावं, असं आंदोलक म्हणाले. यावेळी राज ठाकरे सर्व कार्यकर्त्यांसमोर आले. त्यांनी भेटीसाठी परवानगी दिली. पण यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. “माझ्याशी बोलायचं आहे ना? मग वरती या. या घोषणा आधी बंद करा”, असं राज ठाकरे म्हणाले. यानंतर “राज ठाकरे यांनी आपल्यासोबत अरेरावीची भाषा केली”, असा आरोप कार्यकर्त्यांनी केला. यावेळी आक्रमक कार्यकर्त्यांनी “राज ठाकरे मुर्दाबाद” अशा घोषणा कार्यकर्त्यांनी केल्या.
यानंतर मराठा आंदोलकांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “राज ठाकरे आमच्याशी रुबाबात बोलले, हुकूमशाही पद्धतीने बोलले. तुम्ही शांत बसा, घोषणा बंद करा, बोलायचं असेल तर दोघं जण या. मी त्यांना बोललो, आलो तर आम्ही सर्व येणार. पण ते नाही म्हणाले. राज ठाकरे यांनी अरेरावीची भाषा केली. आता उद्या राज ठाकरे उद्या कशी प्रेस कॉन्फरन्स घेतात ते बघतो. इथे धारावीत दादागिरीची भाषा चालणार नाही”, अशा इशारा मराठा आंदोलकांनी दिला.
यावेळी आणखी एका मराठा आंदोलकाने माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “राज ठाकरे म्हणाले, घोषणा बंद करा. याचा अर्थ काय? आज मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न एवढा गंभीर असताना त्यांनी घोषणा बंद करा म्हटलं”, असं दुसऱ्या आंदोलकाने म्हटलं. तर तिसऱ्या आंदोलकाने राज ठाकरे यांना बाहेर निघू देणार नाही, असं म्हटलं. “जोपर्यंत राज ठाकरे मराठा आरक्षणावर भूमिका मांडत नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांना हॉटेलमधूनल निघू देणार नाही”, असं तिसरा आंदोलक म्हणाला. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत हॉटेलबाहेर ठिय्या मांडला. सध्या पोलिसांकडून आंदोलकांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.