मुंबईः मराठवाड्यातील शिवसेनेला (Marathwada Shivsena) आणखी एक मोठा झटका बसला आहे. शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात शामिल झाले आहेत. नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. खोतकर आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. दोन दिवसांपूर्वीच मी शिवसेनेतच राहणार असे म्हणणाऱ्या अर्जुन खोतकर यांनी आता एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्लीत एकनाथ शिंदे आणि खोतकर यांच्या भेटीचा एक व्हिडिओ दोन दिवसांपूर्वीच व्हायरल झाला होता. मात्र त्यानंतर खोतकरांनी शिंदे गटात जाण्याच्या शक्यता नाकारल्या होत्या. आज पुन्हा एकदा अर्जुन खोतकरांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली आणि त्यानंतर ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला रवाना झाले. या भेटींतच खोतकरांचा शिंदे गटातील प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात आहे. मराठवाड्यातून एकनाथ शिंदेंच्या गटात 9 आमदार आणि 1 खासदार गेले आहेत. आता जालन्याचे मातब्बर नेते समजले जाणार अर्जुन खोतकर हे देखील शिंदे गटात शामिल झाल्याने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला हा जबरदस्त हादरा ठरणार आहे. तसेच भाजप नेते रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यातील वादावरही या निमित्ताने पडदा पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मराठवाड्यातील नावाजलेलं व्यक्तिमत्त्व, माजी मंत्री आणि जालना विधानसभा मतदार संघाचे प्रभावी नेते अशी अर्जुन खोतकर यांची ओळख आहे. वयाच्या 22 व्या वर्षीच ते 1990 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले होते. त्यानंतर त्यांनी चारवेळा आमदारकी भूषवली. 2014 मध्ये ते चौथ्यांदा आमदार होऊन पशुसंवर्धन आणि दुग्धविकास खात्याचे राज्यमंत्री झाले. 1999 पासून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रतिस्पर्धी कैलास गोरंट्याल आणि अर्जुन खोतकर यांच्यात चुरशीची लढत होती. 2014 मध्ये अर्जुन खोतकर केवळ 296 मतांनी विजयी झाले होते. त्यानंतर 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीअंतर्गत निवडणूक लढवली गेल्याने खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यात तणाव होता. अखेर ही जागा भाजपला देण्यात आली. त्यावेळी खोतकरांनी माघार घेतली होती.
2019 मधील लोकसभा निवडणुकांपासून जालन्यात भाजप नेते रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यात वाद निर्माण झाले होते. भाजप-शिवसेना युती झाल्यानंतर हे वाद विकोपाला गेले. त्यानंतर खोतकरांनी माघार घेत रावसाहेब दानवेंसाठी ही जागा सोडली होती. त्यानंतर अर्जुन खोतकरांविरोधात ईडीची चौकशी सुरु झाली. रावसाहेब दानवेंमुळेच ही चौकशी लागल्याचा आरोप अर्जुन खोतकर यांनी केला होता. त्यामुळे दानवे आणि खोतकर यांच्यातील तणाव अधिकच वाढला होता. अखेर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या जोडीने रावसाहेब दानवे-खोतकरांमध्ये समेट घडवून आणल्याचे दिसून येत आहे.