अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागांचे व शेतकऱ्यांच्या जमीनींचे तात्काळ पंचनामे करा, जयंत पाटलांचे आदेश

| Updated on: Sep 24, 2021 | 2:44 PM

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांचे व शेतकऱ्यांच्या जमीनींचे तात्काळ पंचनामे करून नागरिकांना दिलासा देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या असल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. आज परभणी जिल्ह्यात जलसंपदा विभागाची आढावा बैठक जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी घेतली.

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागांचे व शेतकऱ्यांच्या जमीनींचे तात्काळ पंचनामे करा, जयंत पाटलांचे आदेश
मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळं नुकसानग्रस्त भागाच्या पंचनाम्याचे जयंत पाटलांचे आदेश
Follow us on

परभणी : मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने अनेक प्रकल्पांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त प्रकल्पांची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याच्या सुचना दिल्या आहेत. तसंच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांचे व शेतकऱ्यांच्या जमीनींचे तात्काळ पंचनामे करून नागरिकांना दिलासा देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या असल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. आज परभणी जिल्ह्यात जलसंपदा विभागाची आढावा बैठक जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी घेतली. (Conduct panchnama of damaged areas in Marathwada and farmers’ lands due to heavy rains)

या बैठकीत जिल्ह्यातील विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. अनेक प्रकल्पांची दुरुस्ती, कालव्यांची दुरुस्ती व इतर प्रलंबित कामे पूर्ण करण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली. लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यातील ममदापूर, जोड परळी, कोटा आणि पिंपळगाव कुटे हे नवे बंधारे पाणी उपलब्धतेअभावी प्रलंबित होते मात्र आता हा प्रश्न सोडवण्यात आला आहे. त्यामुळे आता हे प्रस्तावित बंधारे पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

‘उच्च दर्जाचे काम करत कालवे अत्याधुनिक केले जातील’

जायकवाडी डावा आणि उजवा कालव्याची वाहन क्षमता कमी झाली आहे. ही गोष्ट गांभीर्याने घेत या कालव्यांची सुधारणा केली जाईल व आधुनिकीकरण केले जाईल. उच्च दर्जाचे काम करत हे कालवे अत्याधुनिक केले जातील असे आश्वासनही मंत्री जयंत पाटील यांनी दिले. या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, खासदार फौजिया खान, खासदार संजय जाधव, आमदार सुरेश वडपूरकर, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार राहुल पाटील, जिल्हाधिकारी आंचल गोयल आणि जलसंपदा विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

सप्टेंबरच्या सुरुवातीला जीवितहानी आणि आर्थिक नुकसान

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मराठवाड्याला मुसळधार पावसाचा जबरदस्त फटका बसला होता. दोन दिवसात तब्बल 31 जणांचा बळी गेल्याची माहिती आहे, तर पाच जण अद्यापही बेपत्ता होते. एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात तब्बल 4 जणांचा मृत्यू झाला, तर नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक 7 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. मराठवाड्यात 120 ते 150 पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाला असून तीन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

पाणीपातळी वाढली पण शेतीचं मोठं नुकसान

सप्टेंबर महिन्यात मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे काही धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली. मराठवाड्यातील बहुतांश धरणं भरत आली असली तरीही शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. त्या काळात मराठवाड्यातील 7 जिल्ह्यातील तब्बल 145 मंडळात अतिवृष्टी झाली होती. काही दिवसांपूर्वी याच मंडळातील पिके ही पाण्याशिवाय गेली होती तर हंगामाच्या शेवटी अतिवृष्टीचा फटका सर्वच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला. औरंगाबाद जिल्ह्यातील 44, जालन्यातील 15, बीडमधील 22, लातुर 7, उस्मानाबाद 1, नांदेड 31 तर परभणी जिल्ह्यातील 26 मंडाळात अतिवृष्टी झाली होती. आता या पुढील पावसाने शेतकऱ्यांचं आणखी नुकसान होण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या :

Delhi Gang War | दिल्ली कोर्टात फिल्मी स्टाईल थरार, वकिलाच्या वेशात गोळीबार, गँगस्टरसह चौघे ठार

परवा एका एकराला 18 कोटी दिले, आता लोकं भेटून सांगतात, दादा तेवढा रस्ता आमच्या शेतातून न्या की…! : अजित पवार

Conduct panchnama of damaged areas in Marathwada and farmers’ lands due to heavy rains