नाशिकः दिवाळीमुळे जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या 10 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, हा निर्णय रद्द करत बाजार समित्या केवळ 3 दिवस बंद ठेवा असा आदेश जिल्हा उप निबंधकांनी दिला आहे.
सध्या दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या काळात किमान दहा दिवस तर मजूर मिळणे शक्य नाही. हे पाहता सलग दहा दिवस बाजार समित्या बंद ठेवण्याचा निर्णय बाजार समित्यांनी घेतला होता. या काळात कांद्यासह सर्व लिलावही बंद राहणार होते. या निर्णयावर फेरविचार करावा, अशी मागणी करत कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने पणन संचालक आणि जिल्हा सहकारी संस्थांचे जिल्हा उप निबंधक सतीश खरे यांना साकडे घातले होते. त्यांनी या मागणीचा सकारात्मक विचार करत बाजार समित्या दहा दिवस बंद ठेवण्याचा निर्णय रद्द केला, तसेच त्या फक्त तीन दिवस बंद ठेवण्याच्या आदेश दिले. या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. सध्या एक तर पावसामुळे खरिप पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यात हाती आलेले पीक शेतकरी बाजार समित्यांमध्ये घेऊन येत आहे. या सणासुदीच्या काळात बाजार समित्या बंद राहिल्या असत्या, तर त्याचा फटका नक्कीच शेतकऱ्यांना बसला असता. त्यामुळे या निर्णयाचे कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे.
बाजार समित्यांची निवडणूक
नाशिक जिल्ह्यातील 23 ऑक्टोबरपर्यंत मुदत संपलेल्या 15 बाजार समित्यांची निवडणूक सहकार खात्याने जाहीर केली आहे. त्यात नाशिकसह पिंपळगाव, लासलगाव, नांदगाव, मनमाड, येवला, चांदवड, देवळा, उमराणे, घोटी, कळवण, दिंडोरी, सिन्नर, मालेगाव व सुरगाणा बाजार समितीचा समावेश आहे. त्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघणार असून, या निवडणुकीत महाविकास आघाडीची मोट बांधली जाणार का, याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
23 ऑक्टोबर 2021 पर्यंत मुदत संपणाऱ्या बाजार समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी 10 नोव्हेंबर रोजी मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. अंतिम मतदार यादी 6 डिसेंबर रोजी प्रसिद्ध होईल, तर 16 डिसेंबरपासून नामांकनास सुरुवात होईल. उमेदवारांना 7 जानेवारी 2022 पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. तर 17 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. आता या निवडणुका सत्ताधारी महाविकास आघाडी एकत्र येऊन लढणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
इतर बातम्याः
उत्तर महाराष्ट्रात थंडी वाढली; जळगावमध्ये 12 अंश सेल्सियस नीचांकी तापमानाची नोंद
Photo : इंधन दरवाढीविरोधात युवासेनेचा एल्गार; पुणे, डोंबविली, सोलापूरसह राज्यभरात सायकल रॅली https://t.co/WnadQuPHsg @ShivSena @AUThackeray @OfficeofUT @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis #FuelPriceHike #PetrolDieselPriceHike #PetrolPrice #DieselPrice #YuvaSenaProtest #YuvaSena
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 31, 2021