रवी खरात, रायगड | 4 नोव्हेंबर 2023 : महाड एमआयडीसीमध्ये ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीला शुक्रवारी भीषण आग लागली होती. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही सात कामगार बेपत्ता आहे. ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीची नव्याने उभारणी सुरु होती. या ठिकाणी असलेला अंजनी बायोटेक हा प्रकल्प दोन वर्षांपासून बंद होता. या ठिकाणी ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीची उभारणी सुरु असताना एका रिअॅक्टरमध्ये स्फोट झाला. त्यानंतर आणखी काही रिअॅक्टरमध्ये स्फोट झाला आणि आग सर्वत्र पसरली. या आगीत सुरुवातील ११ जण बेपत्ता झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. आगीत सात जण जखमी आहे. जखमींवर रुग्णालयात उपाचार सुरु आहे. घटनास्थळी रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी भेट दिली आहे.
ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीत सकाळी पहिल्या शिफ्टमध्ये सुमारे 54 कामगार कामावर होते. त्यावेळी रिअॅक्टमध्ये स्फोट झाला. तब्बल पाच तासानंतर ही आग आटोक्यात आली आहे. त्यात अकरा जण बेपत्ता झाले. महाड एमआयडीसीमध्ये ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीत मध्यरात्री जाऊन रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पाहणी केली आहे. संबंधित कंपनीच्या मालकाशी आपले बोलणे झाले आहे. तसेच या प्रकरणात योग्य ती कारवाई करा, असे निर्देश आपण जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे, असे उदय सामंत यांनी सांगितले. एनडीआरएफच पथक हे हेलिकॉप्टरने येणार होते. मात्र हवामानात बदलामुळे एनडीआरएफचे पथक गाडीने आले. हे पथक आल्यानंतर बचाव कार्य वेगाने सुरु झाले.
आगीच्या घटनेत जखमी झालेले काही कामगार खान्देशातील आहे तर काही बिहारमधली आहे. मयूर निंबाळकर (रा. जळगाव), राहुल गिरमे (धुळे), स्वप्निल मोरे (खेड), भीमाची मुर्मू (ओडिशा), विक्रम ढेरे (भोर), उत्तम विश्वास (बिहार) आणि ज्योतू तोबा पूरम (बिहार) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत कामगारांची नावे अजून समजली नाही. दरम्यान या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.