राज्यातील राजकारणात गेल्या पाच वर्षांत मोठे बदल झाले आहेत. पाच वर्षांपूर्वी एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे एकत्र आले आहेत. त्याचवेळी सोबत असणारे विरोधक झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील राजकारण पवार कुटुंबियांभोवती फिरत आहे. अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार विरुद्ध अजित पवार असेच राजकारण सुरु आहे. तसेच बारामतीमध्ये सुप्रिया सुळे अन् सुनेत्रा पवार अशी नणंद-भावजय यांच्यात लढत होणार आहे. पाच वर्षांपूर्वी २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पवार कुटुंबीय एकत्र होते. त्यावेळी मावळ लोकसभा मतदार संघातून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी निवडणूक लढवली होती. परंतु शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला होता. आता अजित पवार त्याच श्रीरंग बारणे यांचा प्रचार करणार आहेत.
पवार कुटुंबियांचा पहिला पराभव पार्थच्या रुपाने मावळ लोकसभेत झाला होता. श्रीरंग बारणे यांनी 2019साली हा अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना अस्मान दाखवलं होतं. त्यावेळी हा पराभव अजित पवार यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. मात्र अलीकडेच समीकरणं बदलली आहेत. त्यामुळंच अजित पवार मुलाचा पराभव पचवून थेट श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत.
आज मावळ लोकसभेत महायुतीच्या समन्वय बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. यासाठी स्वतः अजित पवार उपस्थित राहणार आहेत. यापुढं अजित पवार मावळ लोकसभेत येऊन श्रीरंग बारणेंच्या विजयासाठी अजित पवार प्रचार करणार आहेत.
२०१९ मध्ये पार्थ पवार आणि श्रीरंग बारणे यांच्यात लढत झाली होती. त्यावेळी श्रीरंग बारणे यांनी ७ लाख २० हजार ६६३ मते मिळाली होती. पार्थ पवार यांना ५ लाख ४ हजार ७५० मते मिळाली होती. बारणे यांनी ५२.६५ टक्के मते घेऊन दणदणीत विजय मिळवला होता. पार्थ पवार यांना ३६.८७ टक्के मते मिळाली होती. त्यापूर्वी २०१४ मध्ये श्रीरंग बारणे यांचा विजय झाला होता. त्यांनी लक्ष्मण पांडुरंग जगताप यांचा पराभव केला होता. आता सरळ तिसऱ्यांदा विजय मिळवण्याच्या तयारीत श्रीरंग बारणे आहेत. यावेळी त्यांच्यासोबत अजित पवारसुद्ध असणार आहे.