नाशिकः नाशिकमध्ये होणाऱ्या साहित्य संमेनात आता मानापमान नाट्याचा अंक सुरू झाला असून, त्यावरून राजकीय कलगीतुरा रंगला आहे. भाजप नेत्यांची नावे कार्यक्रम पत्रिकेत नसल्याने महापौर सतीश कुलकर्णी यांनी संमेलनावर बहिष्कार घातला आहे. केंद्रीयमंत्री डॉ. भारती पवार यांना साधे निमंत्रणही देण्यात आले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आमच्या नेत्यांची नावे मुद्दाम वगळ्याचा आरोप त्यांनी केला असून, ग्रंथदिंडी व्यतिरिक्त कोणत्याही कार्यक्रमांना हजेरी लावणार नसल्याचे म्हटले आहे.
आघाडीच्या नेत्यांचा राबता
नाशिकमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन हजेरी लावणार आहेत. समारोप शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष स्वतः मंत्री छगन भुजबळ आहेत. शिवाय संमेलनात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योग मंत्री सुभाष देसाई, विधानसभेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे हजेरी लावणार आहेत. त्यामुळे आधीच हे संमेलन राजकीय झाल्याचा आरोप होत आहे. साहित्य महामंडळाने राजकीय व्यक्तींना साहित्य संमेलनात प्राधान्य द्यायचे नाही, हे यापूर्वीच ठरवले आहे. त्यासाठी उस्मानाबादचे साहित्य संमेलनाकडे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून पाहता येईल. येथे स्वतः सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख प्रेक्षकांमध्ये बसले होते. मात्र, नाशिकच्या समंलेनाचे उद्घाटन ते समारोपाचा नारळ राजकीय व्यक्तीच फोडणार आहेत.
भाजपला डावलले
साहित्य संमेलनात आघाडीच्या नेत्यांचा राबता राहणार आहे. मात्र, केंद्रीय मंत्री भारती पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना साधे संमेलनाचे निमंत्रणही देण्यात आले नाही. संमेलनासाठी निधी देणाऱ्या भाजपच्या तिन्ही आमदारांचा निमंत्रण पत्रिकेत साधा उल्लेखही नाही. महापालिकेत सध्या भाजपची सत्ता आहे. महापालिकेनेही संमेलनासाठी 25 लाखांचा घसघशीत निधी दिली आहे. त्यानंतरही भाजप नेत्यांना डावलल्याने महापौर सतीश कुलकर्णी नाराज झाले आहेत.
निमंत्रकांची सपशेल माफी?
महापौरांना सोमवारी निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर यांनी निमंत्रण पत्रिका दिला. यावेळी त्यांच्यासोबत संजय करंजकरही होते. पत्रिका पाहताचा महापौरांनी निमंत्रकांना खडेबोल सुनावले. भाजपच्या आमदारांपासून आम्ही महापालिकेने निधी दिला. मात्र, तुम्ही आमच्या पक्षाचे कुणाचेही नाव निमंत्रण पत्रिकेमध्ये टाकले नाही. केंद्रीयमंत्री, विरोधी पक्षनेत्यालाही निमंत्रण दिले नाही, याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यानंतर निमंत्रक जातेगावकर यांनी महापौरांची सपशेल माफी मागितल्याचे समजते.