नांदेडमध्ये ट्विस्ट, चिखलीकरांचा पत्ता कट होणार? अमित शाह यांच्या दौऱ्यामुळे सस्पेन्स वाढला

| Updated on: Mar 06, 2024 | 10:28 PM

नांदेड लोकसभेत भाजपकडून विद्यमान खासदार चिखलीकरांसोबत रातोळीकर यांचंही नाव चर्चेत होतं. त्यात आता मीनल खतगावकरांचं नाव पुढे आलंय. कोण आहेत मीनल खतगावकर आणि त्यांनी अमित शाहांच्या घेतलेल्या भेटीमागचे अर्थ काय निघतात? वाचा स्पेशल रिपोर्ट!

नांदेडमध्ये ट्विस्ट, चिखलीकरांचा पत्ता कट होणार? अमित शाह यांच्या दौऱ्यामुळे सस्पेन्स वाढला
Follow us on

नांदेड | 6 मार्च 2024 : नांदेड लोकसभेसाठी भाजपकडून इच्छूक मीनल खतगावकरांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतल्यानं जिल्ह्यात त्यांच्या उमेदवारीच्या चर्चा आहेत. संभाजीनगरमध्ये मीनल खतगावकरांनी शाहांची भेट घेतली. जर खतगावकरांना उमेदवारी मिळाली तर नांदेडमधल्या 2 माजी काँग्रेसी नेत्यांना राज्यसभेपाठोपाठ लोकसभेचं तिकीट मिळणार आहे. अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडून भाजप प्रवेश केल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांना भाजपनं राज्यसभेचं तिकीट दिलं. चव्हाणानंतर मीनल खतगावकरांनीही काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केल्यानंतर आता त्यांना लोकसभेचं तिकीट मिळण्याची चर्चा आहे.

मीनल खतगावकरांना तिकीट मिळाल्यास स्थानिकांच्या मते हा भाजपचे विद्यमान खासदार प्रतापराव चिखलीकरांसाठी धक्का असणार आहे. कारण अशोक चव्हाण जरी राज्यसभेवर गेले असले तरी मीनल खतगावकर चव्हाणांच्या समर्थक म्हणून ओळकल्या जातात. त्यामुळे नांदेड भाजपात चिखलीकरांच्या वर्चस्वाला चव्हाण पहिला धक्का देतील, असं बोललं जातंय.

मीनल खतगावकर कोण आहेत?

मीनल खतगावकर माजी खासदार भास्करराव पाटलांच्या सून आणि अशोक चव्हाणांच्या नातलग आहेत. भाजप प्रवेशाआधी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या, वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष, अशोक चव्हाणांच्या समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. नांदेड लोकसभेसाठी भाजपकडून मीनल खतगावकर, विद्यमान खासदार प्रतापराव चिखलीकर, जिल्हाध्यक्ष संतुक हंबर्डे, आमदार राम पाटील-रातोळीकर हे इच्छूक आहेत. तर काँग्रेसकडून नायगावचे माजी आमदार वसंतराव चव्हाण, आशा शिंदे आणि माजी खासदार व्यंकटेश काब्ब्देंचं नाव चर्चेत आहे.

मीनल खतगावकरांचं नाव चर्चेत कसं आलं?

गेल्या काही दिवसात ज्या घडामोडी घडल्या आहेत, त्यावरुन भाजपकडून मीनल खतगावकरांचं नाव आघाडीवर असल्याचं दिसतंय. कुणाला तिकीट द्यावं यासाठी नांदेडात भाजपचे पक्षनिरीक्षक दाखल होण्याच्या काही तासांआधीच मीनल खतगावकरांचा भाजप प्रवेश झाला. पक्ष निरीक्षकांच्या बैठकीत इतरांबरोबर खतगावकरांचं नाव सुचवलं गेलं. बैठकीनंतर अशोक चव्हाणांनी माजी खासदार भास्करराव पाटलांच्या घरी भेट दिली. त्यात आता संभाजीनगरमध्ये मीनल खतगावकर अमित शाहांना भेटल्या. या घडामोडींमुळे खतगावकरांचं नाव प्रबळ मानलं जातंय.

गेल्या निवडणुकीवेळी काय घडलेलं?

दुसरीकडे गेल्या लोकसभेत वंचितमुळे जो फटका अशोक चव्हाणांना बसला होता. ते वंचितचे उमेदवार यशपाल भिंगे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची चर्चा आहे. नांदेड लोकसभा भाजपच्या प्रताप चिखलीकर विरुद्ध काँग्रेसचे अशोक चव्हांणांमध्ये झाली. चिखलीकरांना 4,86,806, चव्हाणांना 4,46,658 मतं पडली. चिखलीकरांचा 40,148 मतांनी विजय झाला. मात्र भाजपच्या चिखलीकरांच्या विजयात वंचितच्या यशपाल भिंगेंच्या मतांचा वाटा राहिला. नांदेडात वंचितला 1,66,196 मतं मिळाली.

2019 च्या लोकसभेला यशपाल भिंगे वंचितकडून लढले. मविआ सरकार आल्यानंतर राष्ट्रवादीनं भिंगेंना विधानपरिषदेवर आमदार म्हणून शिफारश केली. मात्र तत्कालीन राज्यपाल कोश्यारींनी त्यावर स्वाक्षरीच केली नाही. यानंतर भिंगेंनी तेलंगणाच्या के.सी.राव यांच्या भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला. सध्या भिंगे बीआरएस सोडून काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. दरम्यान, नांदेड भाजपात जर चिखलीकरांचा पत्ता कापून खतगावकरांना संधी मिळाली, तर काही दिवसांपूर्वीच भाजपच्या अजीत गोपछडेंनी केलेलं मिश्किल विधान खरं ठरेल की काय, अशी कुजबूज नांदेडमध्ये सुरु आहे.