ठाणे : 8 ऑक्टोबर 2023 | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाणे येथे टोल दरवाढी विरोधात उपोषण सुरु केले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाणे येथे जाऊन आंदोलन करणाऱ्या मनसैनिकांशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून मार्ग काढू असे सांगितले. त्यांच्या आदेशानुसार मनसे नेते अविनाश जाधव यांनी उपोषण मागे घेतले. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरीमध्ये ‘जेवढ्या छोट्या गाड्या आहेत त्यांना टोल माफी करण्यात आली आहे. त्यांचे पैसे महाराष्ट्र शासन भरेल असे म्हटले आहे. यावरून अविनाश जाधव यांनी काही प्रश्न उपस्थित केले.
देवेंद्रजी यांची प्रतिक्रिया ऐकली ते असं बोलले आहेत. जेवढ्या छोट्या गाड्या आहेत त्यांना टोल माफी करण्यात आली. त्यांचे पैसे महाराष्ट्र शासन भरेल. मला त्यांना विचारायचं आहे की ही बातमी खरी आहे का? हे जर खरं असेल तर टोल नाकावाले सरकारचे ऐकत नाही का? असा सवाल अविनाश जाधव यांनी केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ती याचिका मागे का घेतली ते कळत नाही. कोर्टाने सांगितले याचिकाकर्तेच आता मंत्री आहेत. त्यांनी निर्णय घ्यावा. ती याचिका रद्द केली की झाली. कशामुळे झाली ते माहित नाही. या गोष्टीला पाच वर्ष झाली. आता ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हातात हा निर्णय असेल तर त्यांनी ठाणेकरांच्या हितासाठी हा निर्णय घ्यावा अशी मागणी अविनाश जाधव यांनी केली.
अजितदादा गटाचे राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांनी अविनाश जाधव हे राजकीय नौटंकी करत आहेत असा आरोप केला होता. त्याला उत्तर देताना ते म्हणाले, ‘आनंद परांजपे यांना आम्ही आमच्या कामाने उत्तर देऊ. अजित दादा जर धरणात xxxx असतील तर ती नौटंकी नसेल तर काय म्हणायचं?’, अशी खरमरीत टीका त्यांनी केली.
ठाकरे गटाच्या नेत्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी ‘मनसेचं भविष्य झिरो आहे. त्यामुळे ते महायुतीत आले तरी झिरो इज़ इक्वल झीरो’ अशी टीका केली होती. त्यावर पलटवार करताना ‘आदित्य ठाकरे वर्ष दीड वर्ष पूर्वी म्हणाले होते मनसे संपलेला पक्ष आहे. पण, नियतीचा खेळ बघा दोन महिन्यात मुख्यमंत्री पद गेलं. आदित्य ठाकरे यांचं मंत्री पद गेलं. आमदार गेले. खासदार गेले. काहीही राहील नाही. प्रियांका चतुर्वेदी आणि सुषमा अंधारे दोघी मिळून पक्ष संपवतील. मायनस शून्य मायनस शून्य करतील असा टोला त्यांनी लगावला.