भाव द्याच… दूध आंदोलन तापले; दूध उत्पादकांच्या संतापाचा कडेलोट; रस्त्यावर उतरून…

| Updated on: Jul 01, 2024 | 3:23 PM

दुधाला किमान 40 रुपये भाव मिळावा म्हणून दूध उत्पादक शेतकरी अत्यंत आक्रमक झाला आहे. गेल्या 28 जूनपासून सुरू झालेलं दूध उत्पादकांचं आंदोलन अजूनही थांबता थांबताना दिसत नाहीये. आज सांगलीत दूध उत्पादक शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी सरकारला अंतिम इशारा दिला आहे.

भाव द्याच... दूध आंदोलन तापले; दूध उत्पादकांच्या संतापाचा कडेलोट; रस्त्यावर उतरून...
दूध आंदोलन तापले; दूध उत्पादकांच्या संतापाचा कडेलोट
Follow us on

दुधाला किमान 40 रुपये भाव मिळावा या मागणीसाठी राज्यभर दूध उत्पादक संघर्ष समितीने विधान भवनाच्या पोस्टरला दुग्धाभिषेक करुन आंदोलन केले. सातत्याने तोटा सहन करावा लागल्याने दूध उत्पादकांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप निर्माण झाला आहे. त्याचाच उद्रेक होताना दिसत आहे. राज्यभरात दूध उत्पादकांनी उत्स्फुर्तपणे ठिकठिकाणी रास्तारोको, उपोषणे, निदर्शने सुरु केली आहेत. सरकारने या सर्व आंदोलनांची दखल घ्यावी आणि दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य कराव्यात, असे आवाहन दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने सरकारला केलं आहे. दूध उत्पादकांच्या विविध मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 28 जूनपासून राज्यात अधिक संघटितपणे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. त्याचे आज सांगलीतही पडसाद उमटले. सांगलीत स्टेशन चौकात दुग्धाभिषेक आंदोलन करण्यात आले. समविचारी विविध शेतकरी संघटना, कार्यकर्ते आणि आंदोलकांमध्ये समन्वय स्थापित करून आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

गेले वर्षभर दूध दराबाबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीची भावना आहे. प्रति लिटर 10 ते 15 रुपयांचा तोटा सहन करून दूध उत्पादक शेतकरी दूध विक्री करत आहेत. दूध उत्पादनातील वाढता तोटा सहनशक्तीच्या पलिकडे गेला आहे. राज्य सरकारने ही परिस्थिती लक्षात घेऊन नागपूर अधिवेशनात जाहीर केल्याप्रमाणे दुधाला किमान 40 रुपये दर द्यावा, बंद केलेले दूध अनुदान पुन्हा सुरु करावे, वाढता उत्पादनखर्च आणि तोटा पाहता अनुदानात वाढ करून ते प्रति लिटर 10 रुपये करावे तसेच अनुदान बंद काळात दूध घातलेल्या शेतकऱ्यांना या काळातील अनुदान द्यावे आदी मागण्या दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने केल्या आहेत.

मागण्या काय ?

दुधाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी तत्कालीन उपाय योजनांच्या बरोबरच दीर्घकालीन दूध धोरण तयार करण्याची नितांत आवश्यकता आहे. दुधाला उत्पादन खर्चावर आधारित योग्य भाव मिळावा यासाठी उसाप्रमाणे दुधालाही एफ.आर.पी. आणि रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू करावे, दूग्धमूल्य आयोगाची स्थापना करावी, पशुखाद्य आणि पशु औषधांचे दर नियंत्रित करावेत, खासगी आणि सहकारी दूध संघाना लागू होईल असा लुटमार विरोधी कायदा करावा, दुध भेसळ रोखावी, अनिष्ट ब्रँडवार रोखण्यासाठी एक राज्य एक ब्रँड धोरणाचा स्वीकार करावा, मिल्कोमीटर आणि वजन काट्यात होणारी दुध उत्पादकांची लुटमार थांबविण्यासाठी तालुका निहाय स्वतंत्र तपासणी निरीक्षकांची नियुक्ती करावी, आदी मागण्या किसान सभेचे अध्यक्ष उमेश देशमुख यांनी केल्या आहेत.

अंत पाहू नका

28 जूनपासून सुरु झालेल्या या आंदोलनाची व्याप्ती राज्यभर विस्तारणार असून राज्य सरकारने या पार्श्वभूमीवर दूध उत्पादकांचा अधिक अंत पाहू नये, असा इशारचा देशमुख यांनी दिलाय. आजच्या या आंदोलनात उमेश देशमुख, सतीश साखळकर, डॉ. संजय पाटील, नितीन चव्हाण, विजय बचाटे, रियाज जमादार, वर्षा गडचे, उदय पाटील आदी उपस्थित होते.