औरंगाबाद : राज्यात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापला असतानाच आता इतर आरक्षणावरूनही वातावरण तापलंय. मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापताना दिसून येत आहे. मुस्लिम आरक्षणासाठी एमआयएम उद्या मुंबईत विराट मोर्चा काढणार आहे. या मोर्चाला औरंगाबादेतून सुरूवात होईल, आणि राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल होणार आहेत. त्यामुळे मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, धनगर आरक्षण असे आरक्षणाचे प्रश्न प्रलंबित असतानाच मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापलाय.
एमआयएम उद्या मुंबईत धडकणार
मुस्लिम आरक्षणासाठी एमआयएम उद्या मुंबईवर विराट मोर्चा काढणार असल्याची माहिती समोर आली आहे. औरंगाबादमधून सकाळी सात वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे. राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून मोर्चासाठी कार्यकर्ते मुंबईत दाखल होणार आहेत. असदुद्दीन ओवेसी यांच्या उपस्थितीत मुंबईत विराट सभेचे आयोजनही करण्यात आले आहे. अशी माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे. या मोर्चाला मुंबई पोलिसांनी मात्र परवानगी नाकारली आहे. तरीही हा विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी सर्व गाड्यांवर तिरंगा झेंडा लावण्यात येणार आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते रॅली रोखण्यासाठी पोलिसांवर दबाव आणत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
ओबीसी समाजाच्या नेत्यांनी सुध्दा रॅलीत सहभागी व्हावे
विविध राजकीय पक्षातील मुस्लिम नेत्यांनी सुध्दा तिरंगा रॅलीत सहभागी होवून अल्पख्यांक मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे म्हणून संघर्ष करावा, तसेच ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द झाल्याने त्या समाजाच्या नेत्यांनी सुध्दा रॅलीत मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
वक्फ मालमत्ता प्रकरणाबाबत मुख्यमंत्र्यांनी तात्काळ बैठक घ्यावी
शरद पवार यांच्यासोबत वक्फ सदस्यांची वक्फ मंडळाच्या विविध मुद्यांवर महत्वपूर्ण बैठक मुंबईत पार पडली होती. बैठकीत शरद पवार यांनी वक्फ मंडळाला विशेष पॅकेज आणि केंद्र, राज्य शासनाच्यावतीने होणारे विविध विकासात्मक प्रस्ताव आणि कामात संपादित झालेल्या वक्फ मालमत्तेचा जिल्हा प्रशासनस्तरावर अडकलेला कोट्यावधींचा मोबदला वक्फ मंडळास मिळण्यासाठी वक्फ सदस्यांच्या मागणीवरुन मुख्यमंत्री यांच्यासोबत विशेष बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले होते. परंतू तीन महिने झाल्यानंतरही बैठक घेण्यात आली नसल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले.
मुंबईतल्या सभेचे ठिकाण गोपनीय
मुंबईतल्या सभेचे ठिकाण मात्र एमआयएमने गोपनीय ठेवले आहे. त्यामुळे ही सभा कुठे होणार आहे, अजून कळालेले नाहीये. हा मोर्चा कसा निघणार? आणि मुंबई पोलीस याबाबत काय कारवाई करणार? हेही पाहणं महत्वाचे ठरणार आहे. ओमिक्रॉन हा नवा व्हेरिएंट आल्यानंतर राज्यात काही नवे नियम लागू करण्यात आले आहेत, त्याच पार्श्वभूमिवर राजकीय सभांना बंदी घालण्यात आली आहे. खबरदारी म्हणून मुंबई पोलिसांकडूनही काही नियम राबवले जात आहेत. त्यामुळेच या सभेचे ठिकाण गोपनीय ठेवण्यात आले आहे.
स्व. काकासाहेब शिंदे यांना श्रध्दांजली अर्पित करणार
औरंगाबादेतून तिरंगा रॅली निघाल्यानंतर कायगाव टोका येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या स्व.काकासाहेब शिंदे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन श्रध्दांजली वाहीली जाणार असल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली.