कृषीमंत्रीपद गेलं, मंत्री अब्दुल सत्तार नाराज? पाहा नेमकं काय म्हणाले

| Updated on: Jul 14, 2023 | 8:13 PM

मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हातून आता कृषीमंत्रीपद निसटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तार यांच्याकडे आता अल्पसंख्याक आणि पणन विभागाची जबाबदारी सोपवली आहे. एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयावर सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली.

कृषीमंत्रीपद गेलं, मंत्री अब्दुल सत्तार नाराज? पाहा नेमकं काय म्हणाले
Image Credit source: tv9
Follow us on

औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या मंत्र्यांना आता जबाबदारी देण्यात आली आहे. पण या खातेवाटपात फेरबदल करण्यात आला आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडील कृषी खातं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना देण्यात आलं आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार यांना मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर आता अब्दुल सत्तार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. एक वर्ष मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळताना आपण कोणकोणते निर्णय घेतले, याची माहिती त्यांनी दिली.

“कृषीमंत्री असताना सर्व मंत्र्यांनी मदत केली. एक वर्ष कृषीमंत्री म्हणून चांगलं काम केलं. एक वर्षात कृषी मध्ये चांगले काम करणारे हे पहिले सरकार आहे. नवे कृषीमंत्री धनंजय मुंडे तरुण आहेत. ते काम करण्यासाठी सक्षम आहेत. धनंजय मुंडे हे कर्तव्यदक्ष शेतकऱ्याचा मुलगा आणि चांगले राजरकारणी आहेत. मराठवाड्या भूमिपुत्र असल्याने धनंजय मुंडे चांगले काम करतील”, अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिली.

“मी आता पणन आणि अल्पसंख्याक मंत्री म्हणून चांगले काम करणार. तसेच या खात्याला निधी वाढवून द्यावा, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विनंती करणार आहे. मिळालेल्या संधीचे सोने करणार. मी ज्या समाजाचा आहे त्या समाजाचे मला खाते मिळालं, ज्या ठिकाणी मी हातगाडी ढकलत होतो त्या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरते”, अशी भावना अब्दुल सत्तार यांनी यावेळी व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा

“मी नाराज नाही आणि मी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खातेबदल करण्याची विनंती केली होती. नागपूरला हिवाळी अधिवेशनावेळी ही मागणी केली होती”, अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिली.

“मी टीव्हीवर बघितले की माझे खाते बदल केले आहे. माझ्याशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे. आता पणन मंत्री म्हणून शेतकऱ्यांचा मालाला चांगला भाव मिळावा म्हणून काम करणार. अल्पसंख्याक समाजाच्या माणसाला अल्पसंख्याक खाते मिळाले आहे आणि त्या संधीचे सोने करणार”, असं सत्तार म्हणाले.

“अगोदरच्या सरकारमध्ये दोन पक्ष होते आता तीन पक्ष आले आहेत आणि यामध्ये तिन्ही नेते मजबूत आहेत. याचा फायदा महाराष्ट्राला होईल. अगोदर डबल इंजिनचं सरकार होतं आणि आता हे ट्रीपल इंजिन सरकार आहे. हे सरकार पूर्ण कार्यकाळ पार पाडेल आणि पुढचं सरकार हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात येईल”, असा विश्वास सत्तार यांनी व्यक्त केला.

अब्दुल सत्तार आणखी काय-काय म्हणाले?

“मी नागपुरात झालेल्या हिवाळी अधिवेशनात खातेवाटप करुन देण्याची विनंती केली होती. तुम्ही दिलेली संधी मी राज्यभरात पूर्ण करेन. पण आपण ज्या खात्यामध्ये काम करतो, माझी इच्छा होती, एक रुपयात पीक विमा व्हावा, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पूर्ण केली होती. माझी इच्छा होती की, पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जसं वर्षाला 6 हजार रुपये मिळतात, तसेच राज्य सरकारकडूनही शेतकऱ्यांना 6 हजार रुपये मिळावे, काही शेतकऱ्यांचे रेशनकार्ड बंद झाले होते, त्यांना प्रतिकुटुंब 1500 रुपये प्रमाणे ऑनलाईन देण्याची सिस्टिम सुरु केली. त्याची आता मोठ्याप्रकारे अंमलबजावणी होत आहे”, असा दावा सत्तार यांनी केला.

“अपघात विमा योजना कंपनीच्या माध्यमातून राबवली जात होती, पण ती कृषी विभागाकडून सुरु केली. शेतकरी कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचं दुर्देवाने अपघाती निधन झालं तर त्याला 2 लाख रुपये मदत देण्याचा निर्णय घेतला. हे सगळं करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदत केली. शेतकऱ्यांना विविध माध्यमातून 12 हजार कोटींची मदत केली. आता कॅबिनेटमध्ये 1500 कोटींचा निर्णय झाला. सूर्यफूल आणि कापूससाठी 1 हजार कोटींची तरतूद केली. आपण शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला”, असं अब्दुल सत्तार म्हणाले.