महिला-बालविकास मंत्र्यांचं फेसबुक अकाउंट हॅक, आदिती तटकरे यांनी स्वत: दिली माहिती

| Updated on: Oct 17, 2024 | 4:15 PM

महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे फेसबुक अकाउंट अज्ञात व्यक्तींनी हॅक केले आहे. हॅकर्सनी आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर तटकरे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. आदिती तटकरे यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

महिला-बालविकास मंत्र्यांचं फेसबुक अकाउंट हॅक, आदिती तटकरे यांनी स्वत: दिली माहिती
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचं फेसबुक अकाउंट हॅक झाल्याची माहिती समोर येत आहे. अज्ञात हॅकर्सने आदिती तटकरे यांचं फेसबुक अकाउंट हॅक केलं आहे. तसेच त्या हॅकर्सकडून आदिती तटकरे यांच्या फेसबुक अकाउंटवरुन काही आक्षेपार्ह पोस्टही करण्यात आल्या आहेत. याबाबतची माहिती स्वत: आदिती तटकरे यांनी ट्विट करत दिली आहे. आदिती तटकरे यांनी संबंधित प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. आता पोलिसांना हॅकर्सचा शोध घेण्यात यश येतं का? तसेच पोलीस संबंधित आरोपींवर काय कारवाई करतात? ते पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

आदिती तटकरे काय म्हणाल्या?

“नमस्कार, माझं फेसबुक अकाऊंट काही अज्ञात व्यक्तींकडून हॅक करण्यात आले असून त्यावरून काही आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला जात आहे. अशा पोस्टवर कृपया आपण व्यक्त होऊ नये, ही नम्र विनंती. याबाबत मी पोलिसांत रितसर तक्रार दाखल केली असून लवकरच या हॅकर्सचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. तसदीबद्दल क्षमस्व”, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.

फेसबुक अकाउंट हॅक होण्याच्या घटनांमध्ये वाढ

फेसबुक अकाउंट हॅक होण्याच्या घटनांमध्ये सध्या वाढ होत आहे. आतापर्यंत अनेक सर्वसामान्य किंवा सेलेब्रेटिंचे फेसबुक अकाउंट हॅक होण्याच्या घटना समोर आल्या आहेत. फेसबुक अकाउंट हॅक करुन हॅकर्स फ्रेंडलिस्टमधील मित्रांकडे पैशांची मागणी करतात. आपण अडचणीत आहोत, त्यामुळे पैसे पाठवा, अशी मागणी हॅकर्सकडून केली जाते. त्यामुळे अनेक जणांची अशाप्रकारे ऑनलाईन फसवणूक केली जाते. विशेष म्हणजे ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये सध्या वाढ झाली आहे. हॅकर्सकडून अनेकांना आतापर्यंत गंडा घालण्यात आला आहे. विशेष म्हणजे आता त्यांची हिंमत इतकी वाढली आहे की ते मंत्र्यांचे अकाउंट हॅक करत आहेत.