महाराष्ट्राच्या राजकारणात मनुस्मृतीवरुन वारंवार वादाची ठिणगी पडते. यावेळी तर मनुस्मृती शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा थेट आरोपच विरोधकांकडून केला जातोय. राज्य सरकारने इयत्ता तिसरी ते बारावीच्या शालेय अभ्यासक्रमात भगवद्गीता आणि मनाचे श्लोक समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. एससीईआरटीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांनुसार राज्याचा शालेय अभ्यासक्रम तयार केला आहे. त्यावर आक्षेप आणि सूचनाही मागवल्या आहेत. यावरुन नव्या वादाला तोंड फुटलंय. पारंपरिक आणि प्राचीन ज्ञानाची ओळख विद्यार्थ्यांना करुन देण्याच्या नावाखाली मनुस्मृती अभ्यासक्रमात आणत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. या आरोपांवरुन वादळ उठल्यानंतर आता मंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
शालेय शिक्षण अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोकांचा समावेश करण्यास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी तीव्र विरोध केला आहे. याबाबत रामदास आठवले यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून मनुस्मृतीचे श्लोक अभ्यासक्रमात घेण्याबाबत तीव्र विरोध दर्शविला. यावेळी दोघांमध्ये झालेल्या चर्चेत दीपक केसरकर यांनी शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोक येणार नसल्याचे ठोस आश्वासन रामदास आठवले यांना दिले आहेत. त्यामुळे शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोक घेण्याच्या विषयाला पूर्णविराम मिळालेला आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले आहे. जातीभेद विषमता आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या भेदभावाच्या अनेक बाबी मनुस्मृतिमध्ये असल्यामुळे मानवतेच्या हक्कासाठी; विषमता आणि जातीभेदाच्या अमानुष रूढी परंपरे विरुद्ध संगर म्हणून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे मनुस्मृतीचे दहन करून सामाजिक क्रांती केली. त्यामुळे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जाळलेल्या मनुस्मृतीचे श्लोक अभ्यासक्रमात घेण्यास आंबेडकरी जनतेचा तीव्र विरोध असल्याचे रामदास आठवलेंनी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना दूरध्वनीद्वारे सांगितले. त्यावर दीपक केसरकर यांनी मनुस्मृतीचे श्लोक अभ्यासक्रमात घेणार नसल्याचे आश्वासन रामदास आठवले यांना दिले.