राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आपल्या रोखठोक बोलण्यामुळे प्रसिद्ध आहेत. त्यांनी केलेल्या भाषणांनी अनेक सभा जिंकलेल्या असतात. विधिमंडळाच्या सभागृहात विरोधकांचा आघाडीवर येऊन सामना ते करत असतात. परंतु राज्य सरकारमधील सर्वात महत्वाचे खाते असलेल्या अर्थ खात्याविषयी त्यांनी आपला संताप व्यक्त केला. त्यांनी अर्थखात्याविषयी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. अर्थ खाते हे सर्वात नालायक खाते आहे. दहा वेळा मी पाठवलेली फाईल त्या खात्याकडून परत येत होती. मात्र मी पण पाठपुरावा सोडला नाही, असे वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी शनिवारी केले. जळगावच्या एका कार्यक्रमात बोलताना गुलाबराव पाटील यांनी अर्थ खात्यावर नाराजी व्यक्त करत आपल्या संतापाला वाट मोकळी करुन दिली.
जळगावात हातपंप दुरुस्ती, वीज पंप दुरुस्ती कर्मचारी संघटनेच्या वतीने मंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार सोहळा पार पडला. त्या वेळी बोलताना गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या पाणी पुरवठा खात्याच्या एका फाईलचा अनुभव सांगितला. ती फाईल मंजुरीसाठी अर्थ खात्याकडे तब्बल दहा वेळा पाठवली. त्यानंतर ती परत आली. पण मी सुद्धा पाठपुरावा सोडला नाही, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
अर्थ खाते हे सर्वात नालायक खाते आहे, या गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावर माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, गुलाबराव पाटील यांना कदाचित अर्थ खात्याचा वाईट अनुभव आला असेल. परंतु मी ही अर्थमंत्री होतो. अर्थ खात्याविषयी अनेकांची अशीच धारणे असते. अर्थ खाते योजनांमध्ये अडथळे आणते, असा आरोप होत असतो. परंतु अर्थ खात्याने अडथळे आणले नसते तर राज्याची तिजोरी एक दिवसात खाली झाली असती.
प्रत्येक ठिकाणी अर्थ खाते हे चाळणी करण्याचे काम करत असते. ते आवश्यकच आहे. अर्थखात्याकडून चाळणी झाल्यावर जिथे आवश्यकता असते तिथेच पैसे दिले जातात. त्यामुळे या खात्याला नालायक खाते म्हणता येणार नाही, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले.