सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. “बीडमध्ये ज्या घटना घडत आहेत त्याला गांभीर्याने घ्यायला हवं. या घटनांमुळे जातीय तणाव वाढतो. चांगल्या अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. कोणतीही घटना घडली की ते आरोपी सांगतात अधिकारी माझा आहे. मी यातून सुटेन. ते विश्वासाने असं बोलतात. त्यामुळे चांगले अधिकारी तिथे जाणे गरजेचे आहे. अनेक माफिया, गुंड, वाळू माफिया हे तिथे आहेत. याची एक चैन झालेली आहे. माझ्या दौऱ्यातही या गोष्टी समोर आल्या. त्यावर योग्यवेळी कारवाई होणं गरजेचं आहे. काही मुलं पकडली जातात ही मुलं 24 वर्षाच्या आतील आहेत”, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली.
“एखाद्याला पिस्तुलीचं लायसन्स देताना त्याची चौकशी होते का? आढावा घेऊन अशा चुकीच्या व्यक्तींना दिलेली लायसन्स रद्द केली पाहिजे. कारवाई झाली पाहिजे, देशमुख हे भाजपचे पदाधिकारी होते. सरपंच चांगले काम करू लागले की त्यांना धोका निर्माण होतो”, असं संजय शिरसाट म्हणाले. दरम्यान, “बीडच्या घटनेला राजकीय दृष्टीने पाहू नका. धनंजय मुंडे, सुरेश धस यांची नावं जोडू नका. या घटनेला राजकीय वळण देता कामा नये”, असंही संजय शिरसाट म्हणाले.
“कल्याणमध्ये आमदार विरोधात कट रचला. मुख्यमंत्री यावर कडक पाऊले उचलतील. शिवसेनेचे आमदार बालाजी किणीकर यांना मारेकरी मारायला येणार हे कळल्यावर ते पोलीस स्थानकात गेले. काही लोक गुन्हेगारांना पोसत आहेत. त्यामुळे हे होत आहे. त्यांच्यावर आता हे सरकार कठोर भूमिका घेणार आहे”, असं संजय शिरसाट म्हणाले.
यावेळी संजय शिरसाट यांनी पालकमंत्रीपदाबाबतही महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. “पालकमंत्री पदाचं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. मात्र तीनही पक्षाचे नेते एकत्र बसतील त्यानंतर निर्णय होईल. अशा सर्वांना सूचना दिलेल्या आहेत”, अशी माहिती संजय शिरसाट यांनी दिली.
“बलात्काराच्या घटनांकडे गांभीर्याने पहायला हवे. हे सगळे गुन्हे फास्ट ट्रॅकवर चालवण्याबाबत सरकारचा विचार विनिमय सुरू आहे”, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली. तसेच “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतलेली भेट सदिच्छा भेट आहे”, असंही संजय शिरसाट यांनी सांगितलं. “महाविकास आघाडीत आता कोणत्याही प्रकाची युती होणार नाही”, असंही ते यावेळी म्हणाले.