एसटी कर्मचारी कृती समितीची राज्य सरकारसोबतची बैठक निष्फळ ठरली आहे. या बैठकीत तोडगा निघाला नाही. त्यामुळे एसटी कर्मचारी संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. एसटी कर्मचारी आज रात्री बारा वाजेपासून संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर कर्मचाऱ्यांनी संप करु नये, असं आवाहन मंत्री उदय सामंत यांनी केलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांची उद्या संध्याकाळी सात वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. पण त्याआधी आज मंत्री उदय सामंत आणि एसटी कर्मचारी कृती समितीची बैठक पार पडली. या बैठकीत उदय सामंत यांनी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याबाबतचं आवाहन केलं. पण कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम राहिले. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांसोबतची सरकारची ही बैठक निष्फळ ठरली आहे.
गणेशोत्सव तोंडावर असताना एसटी कर्मचारी आज रात्रीपासून संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे सत्तेत असणारे आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचा एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा आहे. दुसरीकडे मंत्री उदय सामंत यांनी मध्यस्थी करत ऐन गणेशोत्सवात चाकरमान्यांची गैरसोय नको. त्यामुळे संप मागे घ्या, अशी विनंती केली. पण एसटी कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर जाण्यास आग्रही आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एसटी कर्मचारी कृती समितीची उद्या संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडणार आहे. या बैठकीत तोडगा निघतो का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
“मुख्यमंत्र्यांची बैठक होऊन अंतिम निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती एसटी कर्मचारी कृती समितीचे नेते संदीप शिंदे यांनी दिली. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी या संपावरुन एसटी कर्मचाऱ्यांवर टीका केली. त्यांच्या टीकेला संदीप शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. स्वत:चा टीआरपी वाढवून झालाय, स्वत:चा गल्ला मोजून झालाय, पैसे मोजायची मशीन घरात आणली आहे”, अशी टीका संदीप शिंदे यांनी केली.
“संघटना म्हणून तुम्ही जी काय कृती समिती म्हणत आहे, मी तिला कृती नाही तर किडे समिती मानतो. किडे लागलेले होते, हे लोकं 5 टक्के मलई खाणारे लोकं आहेत. तुम्ही लढो हम कपडे संभालते हैं, असं म्हणणारा संदीप याने चॅनलसमोर येऊन सांगावं की, त्याने संप आहे हे लिहून दिलं आहे म्हणून. ही शरद पवारांची बेगडी असते त्या पॉलिसीची माणसं आहेत. त्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे एसटीतला कष्टकरी हा संविधान साक्षर आहे”, असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले.