‘मासे आणि ऐश्वर्या रॉय हिचे डोळे’, महिला आयोगाच्या नोटीसला मंत्री विजयकुमार गावित यांचं उत्तर, म्हणाले….

| Updated on: Aug 29, 2023 | 8:33 PM

मंत्री विजयकुमार गावित यांनी ऐश्वर्या रॉय हिच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाल्यानंतर राज्य महिला आयोगाने त्यांना नोटीस पाठवली होती. या नोटीसवर अखेर गावित यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

मासे आणि ऐश्वर्या रॉय हिचे डोळे, महिला आयोगाच्या नोटीसला मंत्री विजयकुमार गावित यांचं उत्तर, म्हणाले....
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई | 29 ऑगस्ट 2023 : राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित हे त्यांच्या एका वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. धुळे जिल्ह्यात एका सभेत बोलताना विजयकुमार गावित यांनी अभिनेत्री ऐश्वर्या रॉयचा उल्लेख करत एक वक्तव्य केलं होतं. त्यांच्या त्या वक्तव्यावरुन महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला होता. अनेकांनी या वक्तव्यावरुन विजयकुमार गावित यांच्यावर टीका केली होती. गावित हे डॉक्टर आहेत. तसेच ते राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षणमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे होतं, अशी प्रतिक्रिया सर्वच स्तरातून येत आहे.

“मासे खा. डोळे सुंदर होतात. मग मुलीही पटतात. चेहरा चिकना होतो. ऐश्वर्या रायचे डोळे मासे खाल्ल्यामुळं सुंदर आहे”, असं वक्तव्य विजयकुमार गावित यांनी केलं होतं. त्यांच्या याच वक्तव्यावरुन सर्वत्र टीकेची झोड उठली होती. गावित यांच्यावर फक्त विरोधकच नाही तर सत्ताधारी पक्षाकडूनही टीका करण्यात आली. विशेष म्हणजे राज्य महिला आयोगाने गावितांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेतली.

महिला आयोगाचे कारवाईचे संकेत

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी विजयकुमार गावित यांना त्यांच्या वक्तव्याप्रकरणी नोटीस बजावली होती. तसेच गावित यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे संकेत दिले होते. त्यानंतर चाकणकर यांनी आज ट्विटरवर राज्य महिला आयोगाच्या नोटीसला गावित यांनी उत्तर दिल्याची माहिती दिली आहे. यामध्ये त्यांनी त्यांच्या संबंधित वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.

विजयकुमार गावित यांचं महिला आयोगाच्या नोटीसला नेमकं उत्तर काय?

“धुळे जिल्ह्यात सभेत बोलत असताना महिलांच्या अनुषंगाने केलेल्या वक्तव्याबाबत राज्य महिला आयोगाने मंत्री विजयकुमार गावित यांना खुलासा सादर करण्यास सांगितले होते. मंत्री गावित यांनी आपला खुलासा सादर करत आपण उपस्थित स्थानिक आदिवासी बांधवांना अहिराणी आणि त्यांच्या स्थानिक भाषेत संबोधन करत होतो, मात्र माझ्या वक्तव्याचा वृत्तवाहिन्यांकडून विपर्यास करण्यात आला, असं स्पष्टीकरण देण्यात आलंय”, अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी ट्विटरवर दिली आहे.

‘माझा उद्देश महिलांचा अपमान करणं नव्हता, तर…’

“माझा उद्देश महिलांचा अपमान करणे नव्हता. माझ्याकडून या आधी सुध्दा कधीही महिलांचा अपमान होईल असे शब्द प्रयोग केले गेलेले नाहीत व यापुढेही केले जाणार नाहीत. मी समाजातील सर्व महिलांचा आदरच करत आलेलो आहे असे म्हटले आहे. तरी आपल्या वक्तव्यामुळे समाजातील कोणत्याही महिला वर्गास त्यांचा अपमान केला असे त्यांना वाटत असेल तर आपण त्याबाबत दिलगिरी व्यक्त करतो असे त्यांनी म्हटले आहे”, असंदेखील रुपाली चाकणकर यांनी दिली.