मुंबई : “मासे खा. डोळे सुंदर होतात. मग मुलीही पटतात. ऐश्वर्या रायचे डोळे मासे खाल्ल्यामुळं सुंदर आहेत”, असं वक्तव्य राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी केलं. त्यावरुन राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. राज्याच्या महिला आयोगाने विजय कुमार यांच्या वक्तव्याची दखल घेऊन त्यांना नोटीस पाठवली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी या विषयावर आपली भूमिका मांडली. विजयकुमार गावित हे डॉक्टर आणि माजी वैद्यकीय शिक्षणमंत्रीदेखील आहेत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
हे वक्तव्य आपल्यावरच उलटतय हे लक्षात आल्यानंतर विजयकुमार गावित यांनी, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असा दावा केला. “ऐश्वर्या राय ही माझ्या मुलीसारखी आहे” अस गावित म्हणाले. “फिश ऑईलचे फायदे आदिवासी लोकांना समजावून सांगत होतो. आरोग्यासाठी मासे चांगले असल्याचं मी म्हणालो” असही गावित म्हणाले.
विजयकुमार गावित यांना उत्तर देण्यासाठी किती दिवसाचा कालावधी?
“विजयकुमार गावित यांनी सार्वजनिक कार्यक्रमात काही गोष्टी सांगत असताना, ज्या पद्धतीने उल्लेख केला ते निश्चितच महिलांच अपमान करणारा वकत्तव्य आहे. राज्य महिला आयोगाला काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत” असं रुपाली चाकणकर म्हणाल्या. “महिला आयोगाने त्या तक्रारींची दखल घेतं, त्यांना नोटीस पाठवली आहे. त्यांना उत्तर देण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी आहे” असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.
रुपाली चाकणकर काय म्हणाल्या?
“महिला आयोग हा महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणासाठी काम करत असतो. समाजात काम करत असताना, अशा घटना घडतात. त्याची आम्ही दखल घेतो. पण ज्या पद्धतीने हे वक्तव्य केलय, विजयकुमार गावित यांनी त्याचा खुलासा सादर करावा, त्यांचा उद्देश काय आहे? त्याची यामागची भूमिका समजेल” असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.