गृहराज्यमंत्र्यांचा सर्वात मोठा दावा, शरद पवार महायुतीत सामील होणार?

| Updated on: Jan 03, 2025 | 8:19 PM

राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महायुतीत सामील होण्याची शक्यता आहे, असं मोठं भाकीत वर्तवलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

गृहराज्यमंत्र्यांचा सर्वात मोठा दावा, शरद पवार महायुतीत सामील होणार?
शरद पवार
Image Credit source: ANI
Follow us on

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सत्ताधारी आणि विरोधी या दोन्ही गटांचं आगामी काळात मनोमिलन होणार का? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया देण्यात येत आहे. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार हे पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. असं असलं तरी तसं झालं तर मग उपमुख्यमंत्री अजित पवार हे सत्ता सोडून शरद पवारांकडे जाणार की शरद पवार हे विरोधातील महाविकास आघाडी सोडून सत्तेत सहभागी होणार? हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते तथा राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

योगेश कदम नेमकं काय म्हणाले?

“कदाचित राष्ट्रवादी शरद पवार गट महायुतीत सामील होऊ शकतो. याबाबत अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये अनेक बैठका झालेल्या आहेत”, असं मोठं भाकीत राज्यमंत्री योगेश कदम यांनी वर्तवलं आहे. “महाविकास आघाडीचे अनेक पराभूत उमेदवार महायुतीच्या वाटेवर आहेत. महाविकास आघाडीचा प्रत्येक पराभूत आमदार महायुतीसोबत जोडण्याचा प्रयत्न करत आहे”, असाही मोठा दावा त्यांनी केला. तसेच “महायुतीची सत्ता ही कायम राहणार आहे”, असा विश्वास योगेश कदम यांनी व्यक्त केला आहे.

रत्नागिरीचा पालकमंत्री कोण होणार?

यावेळी योगेश कदम यांनी रत्नागिरीचा पालकमंत्री कोण होणार? याबाबतही महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. “मी यापूर्वी सांगितलेला आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री पद उदय सामंत यांना मिळावं. उदय सामंत हे सीनियर नेते आहेत. उदय सामंत माझ्यासाठी भाऊ आहेत. आमच्यात कोणत्याही वाद नाही”, असंही योगेश कदम म्हणाले आहेत.

हे सुद्धा वाचा

गृहराज्यमंत्री म्हणून काय-काय कारवाई करणार?

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मुंब्र्यात मराठी तरुणाला मारहाण प्रकरणी देखील कारवाई केली जाणार असल्याची माहिती दिली. “मुंब्रामध्ये मराठी तरुणाला मारहाण प्रकरणात कडक कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत कारवाई करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत. मराठी भाषेला प्राधान्य दिलंच पाहिजे. याबाबत कुठलंही दुमत नाही. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे”, अशी प्रतिक्रिया योगेश कदम यांनी दिली.

योगेश कदम यांनी ड्रग्जच्या कारवाईवरही माहिती दिली. “शहरांमधून अंमली पदार्थाचा वापर केला जातो. ड्रग्जच्या सेवनांपासून तरुणांना वाचवायचं आहे. ड्रग्ज पेडलरपर्यंत पोहोचायचं आहे. ड्रग्जची आंतरराष्ट्रीय तार तिथपर्यंत पोहोचायचं आहे. याबाबत 8 तारखेला पोलीस प्रशासनाचा आढावा घेणार आहोत. स्वतः ग्राउंडवर उतरून यावर कारवाई करायला लावणार आहे”, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली.